इराणमध्ये पाणी टंचाईवरुन तीव्र निदर्शने

- दोन निदर्शकांचा बळी

पाणीतेहरान – इराणच्या कुझेस्तान प्रांतातील पाणी टंचाईच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांवर सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवाईत गोळीबारात दोघांचा बळी गेला. काही संधीसाधू आणि दंगलखोरांमुळे या निदर्शकांचा बळी गेल्याचा आरोप इराणच्या सुरक्षा यंत्रणा करीत आहेत. तर शांततेने निदर्शने करणार्‍यांवर गोळीबार करणारी इराणी सुरक्षा यंत्रणा आपल्या साथीदारांच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचा आरोप निदर्शक करीत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या निदर्शनांवेळी इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांच्याविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

नैऋत्य इराणचा कुझेस्तान प्रांत दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला आहे. या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. इराणमधील खामेनी-रोहानी यांची राजवट आपल्या पाण्याच्या समस्येकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा ठपका सरकारविरोधी गटांनी ठेवला. त्याचबरोबर गेल्या तीन दिवसांपासून कुझेस्तान प्रांतातील प्रमुख शहरांमध्ये पाण्याच्या मागणीसाठी मोर्चे काढण्यात आले होते. यावेळी खामेनी-रोहानी राजवटीविरोधात घोषणा देण्यात आल्या. काही निदर्शकांनी ‘हुकूमशहाचा नाश होवो’, ‘खामेनीचा नाश होवो’, अशा घोषणा देऊन आपला असंतोष व्यक्त केला.

कुझेस्तानच्या शादेगन शहरातील निदर्शनामध्ये इराणी सुरक्षा यंत्रणेने केलेल्या गोळीबारात दोन तरुणांचा बळी गेला. निदर्शकांमधील काहीजणांनी या तरुणांवर गोळी झाडल्याचा आरोप स्थानिक यंत्रणा करीत आहेत. तर इराणी राजवटीच्या बचावासाठी व निदर्शनांना बदनाम करण्यासाठी हे आरोप केले जात असल्याचा पलटवार निदर्शकांनी केला. पण काही झाले तरी ही निदर्शने थांबणार नसल्याचा इशारा निदर्शकांनी दिला.

कुझेस्तान प्रमाणे इराणच्या इतर शहरांमध्येही पाण्याच्या टंचाईमुळे निदर्शने पेटली आहेत. इराणच्या राजवटीशी संलग्न असलेल्या आघाडीच्या माध्यमांनी या निदशर्नांकडे पाठ फिरवल्याचे दिसते. पण सोशल मीडिया तसेच पाश्‍चिमात्य देशांमधील खामेनी राजवटविरोधात ठाम भूमिका घेणार्‍या पर्शियन माध्यमांनी या निदर्शनांचे व्हिडिओ व फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले. इराणची राजवट कुझेस्तान प्रांताला भेदभावपूर्ण वागणूक देत असल्याचा आरोप यामुळे अधिकच जोर पकडत आहे.

इराकच्या बसरा प्रांताजवळ असलेला कुझेस्तान हा इराणमधील आघाडीचा इंधनसंपन्न प्रांत आहे. त्यामुळे कुझेस्तान प्रांताची अर्थव्यवस्थाही मोठी आहे. इराण हा शियापंथिय देश असला तरी कुझेस्तान प्रांतात सुन्नीपंथियांची बहुसंख्या आहे. त्यामुळे इराणच्या इंधन व्यापारात हा प्रांत मोठे योगदान देत असला तरीही खामेनी यांची राजवट आपल्या प्रांताची उपेक्षा करीत असल्याची तक्रार स्थानिक करीत आले आहेत. पाणी टंचाईच्या विरोधात भडकलेल्या या आंदोलनाला ही राजकीय पार्श्‍वभूमी लाभलेली आहे.

2019 साली इराणमध्ये खामेनी-रोहानी राजवटीविरोधात भडकलेल्या आंदोलनाचे केंद्र कुझेस्तान प्रांतातच होते. त्यावेळी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने कठोर कारवाई करून राजवटीविरोधातील हे आंदोलन दडपले होते.

leave a reply