पाकिस्तानच्या ‘आयएसआय’चा अफगाणिस्तानातील भारताच्या प्रकल्पांवर हल्ल्याचा कट

- दहशतवाद्यांना सूचना देऊन अफगाणिस्तानात धाडले

‘आयएसआय’नवी दिल्ली – तालिबानला सहाय्य करण्यासाठी पाकिस्तानातील दहा हजार दहशतवाद्यांनी आपल्या देशात शिरकाव केल्याचा आरोप अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी केला होता. या दहा हजार जणांमध्ये ‘लश्कर-ए-तोयबा’सारख्या भारतात घातपात घडविणार्‍या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांना पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ने विशेष सूचना दिली आहे. अफगाणिस्तानात भारताने उभे केलेले प्रकल्प व इमारती यांना लक्ष्य करण्याचे आदेश ‘आयएसआय’ने दिल्याच्या बातम्या येत आहेत. यामुळे अफगाणिस्तानातील भारताचे प्रकल्प व हितसंबंध यांना असलेला धोका अधिकच बळावला आहे.

भारताने अफगाणिस्तानात सुमारे तीन अब्ज डॉलर्सची मोठी गुंतवणूक केली आहे. अफगाणिस्तानच्या उभारणीसाठी भारत देत असलेल्या योगदानाचे अफगाणी जनतेने स्वागत केले होते. अफगाणिस्तानच्या 34 प्रांतांमध्ये भारताचे चारशेहून अधिक प्रकल्प आहेत. यामध्ये 42 मेगावॅट इतकी वीजनिर्मिती करणार्‍या ‘सलमा डॅम’चा समावेश आहे. या धरणाला ‘इंडिया-अफगानिस्तान फ्रेंडशिप डॅम’ म्हणनच ओळखले जाते. याबरोबरच भारताने अफगाणिस्तानमध्ये 218 किलोमीटरचा डेलाराम-झरंज महामार्ग विकसित केला आहे. अफगाणिस्तानच्या संसदेची इमारत देखील भारताने उभारून दिली आहे.

भारताची अफगाणिस्तानतील ही गुंतवणूक लक्ष्य करण्याचे आदेश पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ने आपल्या दहशतवाद्यांना दिले. लवकरच हे दहशतवादी त्याची अंमलबजावणी करतील. तालिबानने सलमा धरणाच्या जवळपास हल्ले चढवून तसे संकेत दिले होते. अफगाणी लष्कराबरोबर तालिबानचे युद्ध सुरू असून सध्या या युद्धात तालिबानची सरशी होत असल्याचे दावे केले जातात. तालिबानला या युद्धात सहाय्य करण्यासाठी पाकिस्तानातील दहा हजार दहशतवादी अफगाणिस्तानात घुसले आहेत. यात पाकिस्तानी लष्कराच्या लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकार्‍यांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. पाकिस्तानी लष्कर व आयएसआयचे सुमारे 400 जण अफगाणिस्तानात राहून तालिबानला आवश्यक ते सहाय्य पुरवून सूचना देत असल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानच्या लष्करी अधिकार्‍यांना अफगाणी लष्कराने अटक करून त्यांची ओळख देखील जगजाहीर केली होती.

‘आयएसआय’अफगाणिस्तानात रक्तपात घडविण्यासाठी पाकिस्तान तालिबानला सहाय्य करीत असल्याचे गंभीर आरोप अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी व उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह करीत आहेत. उझबेकिस्तानमधील परिषदेत अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानी पंतप्रधानांच्या उपस्थितीतच हे आरोप करून पाकिस्तानचे वाभाडे काढले होेते. आता भारताच्या विकास प्रकल्पांवर हल्ले चढवून पाकिस्तान आपला तालिबानशी थेट संबंध असल्याची बाब स्वतःहून जगजाहीर करीत असल्याचे दिसते. यामुळे अफगाणिस्तानातील भारतीय व भारताचे विकासप्रकल्प यांना असलेला धोका अधिकच वाढला आहे. भारताचे नुकसान करण्यासाठी आसुसलेल्या पाकिस्तानला आपल्या या हल्ल्यांचे परिणाम अफगाणी जनतेला भोगावे लागतील, याची पर्वा नाही.

पाकिस्तानच्या कटानुसार हे हल्ले यशस्वी ठरले तर भारताची हानी केल्याचे समाधान पाकिस्तानला मिळू शकेल. मात्र अफगाणिस्तानच्या जनतेमधील पाकिस्तानच्या विरोधातील भावना यामुळे अधिकच प्रबळ होईल. पुढच्या काळात याचा फार मोठा फटका पाकिस्तानला बसल्यावाचून राहणार नाही. भारत अफगाणिस्तानबाबत नक्की कुठले धोरण स्वीकारील, याची चर्चा सध्या पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये रंगलेली आहे. भारतालाच अफगाणिस्तानात स्थैर्य नको असल्याचा तर्क काही पाकिस्तानी पत्रकार लढवत आहेत. मात्र भारताने अफगाणिस्तानात केलेली तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक या देशात अस्थैर्य माजविण्यासाठी होती का? असा प्रश्‍न विचारून विश्‍लेषक तिथल्या तिथेच त्याला प्रत्युत्तर देत आहेत.

भारतासारखा मोठा देश अफगाणिस्तानातील आपली गुंतवणूक बुडीत जाऊ देणार नाही. तालिबानने भारताशी सहकार्य करण्याचे नाकारून पूर्णपणे भारतविरोधी भूमिका स्वीकारली, तरी तालिबानला रोखण्यासाठी भारतासमोर अनेक पर्याय असू शकतात, असा दावा भारताचे माजी लष्करी अधिकारी करीत आहेत.

leave a reply