नेपाळच्या अंतर्गत प्रश्‍नात ढवळाढवळ स्वीकारली जाणार नाही

- नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला अप्रत्यक्षरित्या सुनावले

नवी दिल्ली – नेपाळ आपल्या अंतर्गत समस्या हाताळण्यास समर्थ असून यामध्ये बाहेरील कोणाचीही ढवळाढवळ नेपाळला मान्य नाही, असे भारत दौर्‍यावर आलेले नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदिप कुमार ग्यावली यांनी म्हटले आहे. गेल्या महिन्यात नेपाळमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली होती. नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी संसद विसर्जित करून निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे अस्वस्थ झालेल्या चीनने आपल्या नेत्यांना नेपाळमध्ये पाठविले होते. या पार्श्‍वभूमीवर भारत दौर्‍यावर असलेल्या ग्यावली यांनी चीनला अप्रत्यक्षरित्या लक्ष्य केले आहे. नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांची भेट घेतली. भारत आणि नेपाळमधील संबंधांना मर्यादा नाही, असे यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी अधोरेखित केले.

नेपाळचे परराष्ट्रमंत्री ग्यावली भारत दौर्‍यावर असून नेपाळमध्ये राजकीय अस्थिरतेच्या पार्श्‍वभूमीवर हा दौरा होत आहे. गेल्यावर्षी नेपाळने भारतीय भूभागासह असलेला नकाशा प्रसिद्ध केल्यावर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र वर्षाअखेरीस पुन्हा दोन्ही देशांमधील संबंध पूर्ववत होत असल्याचे संकेत मिळाले होते. भारताचे रॉ प्रमुख, त्यानंतर लष्करप्रमुख आणि परराष्ट्र सचिवांनी नेपाळचा दौरा केला होता. यानंतर नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या भारत दौर्‍याची घोषणा झाली होती. काही दिवसांपूर्वीच आपण भारताकडून आपला भूभाग मिळवूच असे नेपाळच्या पंतप्रधानांनी म्हटले होते. मात्र त्यांचे हे बोल नेपाळमध्ये त्यांच्यावर होणारी टीकेची धार बोथट करण्यासाठी होते, असे स्पष्ट होत आहे. या पार्श्‍वभूमीवर नेपाळचे परराष्ट्रमंत्री भारतात आले आहेत.

शुक्रवारीच भारताने नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौर्‍यात सीमावादावर चर्चा होणार नाही, असे स्पष्ट केले होते. भारताने या विषयावर नंतर चर्चा करू असे ग्यावली यांना स्पष्टपणे चर्चेदरम्यान सांगितल्याचे वृत्त आहे. शनिवारी ग्यावली यांच्या तीन दिवसीय नेपाळ दौर्‍याची सांगता झाली. या आपल्या भारत भेटीत नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर आणि इतर नेत्यांबरोबर केलेल्या चर्चेचे तपशील जाहीर झालेले नाहीत.

मात्र दौर्‍याची सांगता होत असताना नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनवर निशाणा साधला आहे. नेपाळच्या अंतर्गत राजकारणात ढवळढवळ सहन करणार नाही. यासंदर्भात चिंता आणि प्रश्‍न असू शकतात. मात्र हस्तक्षेप नको, असे ग्यावली म्हणाले. त्यांनी अप्रत्यक्षरित्या चीनला यातून सुनावले आहे. भारत आणि चीनबरोबर नेपाळचे संबंध चांगले आहेत. या दोन्ही देशांची नेपाळशी असलेल्या संबंधांची तुलना एकमेकांशी होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र सध्या चीनचा नेपाळवरील प्रभाव कमी झाल्याचे संकेत यातून मिळत आहेत.

leave a reply