भारत-जपानमध्ये आयटी क्षेत्रातील सहकार्याचा महत्त्वपूर्ण करार

नवी दिल्ली – भारत आणि जपानमध्ये आयटी क्षेत्रातील सहकार्याचा करार संपन्न झाला आहे. यानुसार भारत व जपान एकमेकांना ‘५जी’ ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ व ‘सबमरिन केबल नेटवर्क’साठी सहाय्य करतील. भारताचे माहिती आणि प्रसारमंत्री रविशंकर प्रसाद व जपानचे अंतर्गत व्यवहार आणि संपर्क विभागाचे मंत्री ‘टाकेडा रियोटा’ यांनी या करारावर स्वाक्षर्‍या केल्या. यामुळे भारताच्या ‘५जी’ क्षेत्रात वर्चस्व गाजविण्याचे चीनचे इरादे धुळीला मिळाल्याचे संकेत मिळत आहेत.

कोरोनाच्या साथीचे संकट टळत असल्याचे दिसू लागल्यानंतर, भारताने आर्थिक आघाडीवर महत्त्वाचे निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. देशाचे अर्थकारण रूळावर आणण्याबरोबरच चीनसारख्या देशाला वेगवेगळ्या आघाड्यांवर धक्के देण्याची जोरदार तयारी भारताने केली आहे. यानुसार भारताने जपानबरोबरील ‘आयटी’क्षेत्रातील सहकार्य वाढविले असून याचा फार मोठा परिणाम पुढच्या काळात दिसेल. जपानबरोबर सामंजस्य करार करून भारताने ‘आयटी’ क्षेत्राशी निगडीत असलेल्या ‘५जी’ ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ व ‘सबमरिन केबल नेटवर्क’साठी जपानचे सहकार्य मिळविले आहे. भारत-जपान या लोकशाहीवादी देशांचा समान मुल्यांवर विश्‍वास आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्र स्वतंत्र व मुक्त असावे यावर उभय देशांचे एकमत आहे. म्हणूनच दोन्ही देशांचे अनेक आघाड्यांवर सहकार्य प्रस्थापित करणे अत्यावश्यक ठरते, असे मला वाटते, असे सांगून जपानचे मंत्री रियोटा यांनी भारताबरोबरील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.

‘‘‘५जी’च्या आघाडीवरील आपला अनुभव व कौशल्य याचा भारतासारख्या मित्रदेशाला लाभ करून देण्यासाठी जपान उत्सुक आहे’’, असेही रियोटा पुढे म्हणाले. ‘आर्टिफिशल?इंटेलिजन्स’ व ‘ऑप्टिक फायबर केबल्स’च्या भारतातील गरजांची जपानला आधीपासून जाणीव आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात चेन्नई ते अंदमान-निकोबारमध्ये ऑप्टिकल फायबर टाकण्याचे कंत्राट भारताने जपानच्या कंपनीलाच दिले होते, ही माहिती या निमित्ताने समोर आले आहे.

भारताच्या ‘४जी’ व ‘५जी’ क्षेत्रात गुंतवणुकीची फार मोठी संधी उपलब्ध आहे, जपानच्या कंपन्यांनी त्याचा लाभ घेऊन भारतात गुंतवणूक करावी, असे आवाहन यावेळी रविशंकर प्रसाद यांनी केले. दरम्यान, चीनच्या हुवेई कंपनीने भारताची ‘५जी’ बाजारपेठ बळकावल्याची स्थिती गेल्या वर्षी निर्माण झाली होती. मात्र चीनने लडाखच्या एलएसीवर घुसखोरी करून भारताबरोबरील सहकार्याच्या सार्‍या शक्यता निकालात काढल्या आहेत. याचे परिणाम दिसू लागले असून भारत ‘५जी’ तंत्रज्ञानासाठी जपानशी सहकार्य करीत आहे.

पुढच्या भारताचे जपानबरोबरील या क्षेत्रातील सहकार्य अधिकाधिक विस्तारत जाईल, असा विश्‍वास भारतीय अधिकारी व्यक्त करीत आहेत. विशेषतः ‘५जी’चा भारताच्या कृषी, वाहतूक व आपत्ती निवारणासाठी वापर होऊ शकतो. जपानने आपल्या देशात या क्षेत्रात काम केलेले आहे, अशी माहिती भारतीय अधिकार्‍यांनी दिली आहे.

leave a reply