इस्रायलमधील अंतर्गत संघर्षाचा शत्रूंवरील कारवायांवर परिणाम होणार नाही

- रविवारीही सिरियात हवाई हल्ला चढविल्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांचा संदेश

दमास्कस/तेहरान/जेरूसलेम – रविवारी इस्रायलने सिरियात आणखी एक हवाई हल्ला चढविला. सिरियाच्या होम्स प्रांतातील या हल्ल्यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचे ‘मिलिटरी ॲडव्हायझर’ मेघदाद मेहघानी ठार झाले. याआधी गुरुवार, शुक्रवारीही इस्रायलने सिरियात हवाई हल्ले चढवून रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सना लक्ष्य केले. यात एक जण ठार तर पाच जण जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर, रविवारी इस्रायलने चढविलेल्या हल्ल्यावर इराणची प्रतिक्रिया आली आहे. इस्रायलला याची जबर किंमत चुकती करावी लागेल, असा इशारा इराणने दिला आहे. तर आमच्या देशात अंतर्गत संघर्ष सुरू असला, तरी शत्रूदेशाविरोधातील इस्रायलच्या कारवायांवर याचा परिणाम होणार नाही, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी बजावले आहे.

इस्रायलमधील अंतर्गत संघर्षाचा शत्रूंवरील कारवायांवर परिणाम होणार नाही - रविवारीही सिरियात हवाई हल्ला चढविल्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांचा संदेशमार्च महिन्याच्या सुरूवातीपासून आत्तापर्यंत इस्रायलने सिरियात सहा वेळा हवाई हल्ले चढविले. या हल्ल्यांचे लक्ष्य सिरियात तैनात असलेल्या इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍स’चे अधिकारी व शस्त्रसाठा असल्याचे उघड झाले होते. इस्रायलने या हल्ल्यांची कबुली दिली नव्हती किंवा याचा इन्कारही केला नाही. पण हे हल्ले इस्रायलच चढवित असल्याचा आरोप सिरिया व इराण करीत आहे. इतकेच नाही तर या दोन्ही देशांनी यावरून इस्रायलला गंभीर परिणामांच्या धमक्या दिल्या आहेत.

रविवारी सकाळच्या सुमारात सिरियाच्या होम्स शहरात हवाई हल्ला झाला, अशी माहिती सिरियन वृत्तसंस्थेने दिली. यात रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचे मिलिटरी ॲडव्हाझर मेघदाद मेहघानी ठार झाले. इराणने ही माहिती देऊन हा हल्ला चढविणाऱ्या इस्रायलला याची जबर किंमत चुकती करावी लागेल, असे रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सने आपल्या निवेदनात म्हटले आहे. इस्रायलमधील अंतर्गत संघर्षाचा शत्रूंवरील कारवायांवर परिणाम होणार नाही - रविवारीही सिरियात हवाई हल्ला चढविल्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांचा संदेशयाआधीही इस्रायलच्या सिरियातील हल्ल्यांवर सडकून टीका करून हे हल्ले सिरियाच्या सार्वभौत्त्वाचे उल्लंघन करणारे असल्याचा ठपका इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने ठेवला होता.

रविवारी पार पडलेल्या इस्रायली मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी लक्ष वेधून घेणारी विधाने केली आहेत. सध्या इस्रायलमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे. पण या संघर्षामुळे इस्रायलच्या आपल्या शत्रूविरोधातील कारवायांवर परिणाम होणार नाही, या कारवाया सुरूच राहतील, असा इशारा पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी दिला. दहशतवाद्यांची पाठराखण करणाऱ्या देशांना आम्ही याची मोठी किंमत चुकती करण्यास भाग पाडत आहोत, असे सूचक उद्गार यावेळी पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी काढले. सिरिया इराणपुरस्कृत आणि इस्रायलविरोधी दहशतवादी कारवायांसाठी सहाय्य करीत असून त्यामुळेच इस्रायल सिरियात हवाई हल्ले चढवित असल्याचे संकेत याद्वारे इस्रायली पंतप्रधानांनी दिले आहेत.

इस्रायलमधील अंतर्गत संघर्षाचा शत्रूंवरील कारवायांवर परिणाम होणार नाही - रविवारीही सिरियात हवाई हल्ला चढविल्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांचा संदेश‘यासंदर्भात आमच्या शत्रूंनी चूक करू नये, असा सल्ला मी त्यांना देईन’, असे सांगून पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी इस्रायल आपली आक्रमकता सोडणार नसल्याचा संदेश दिला. काहीही झाले तरी सिरियाला इस्रायलविरोधी कारवायांचा अड्डा बनू देणार नाही, असे इस्रायलने याआधीच बजावले होते. इराण सिरियाचा शस्त्रास्त्रांच्या कोठारासारखा वापर करीत असून अखेरीस ही शस्त्रे इस्रायलवर हल्ल्यासाठीच वापरली जाणार आहेत, असे इस्रायलचे म्हणणे आहे. म्हणूनच आधीच ही शस्त्रे व सिरियातील इराणच्या हस्तकांना संपविणे आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अनिवार्य असल्याचा दावा इस्रायलकडून केला जातो. सिरिया व इराणने याविरोधात इस्रायलवर आगपाखड करून अनेकवार याच्या गंभीर परिणामांचे इशारे दिले होते. पण इस्रायलने याची पर्वा न करता सिरियातील आपले हवाई हल्ले अधिकाधिक तीव्र केल्याचे दिसत आहे.

leave a reply