निदर्शने दडपण्यासाठी इराणमधील इंटरनेट, मोबाईलसेवा खंडीत

- इराणमधील निदर्शनांना 100 दिवस पूर्ण * 90 निदर्शकांना फाशीची शिक्षा जाहीर

तेहरान – इराणमध्ये हिजाबसक्तीच्या विरोधात सुरू झालेल्या निदर्शनांना 100 दिवस पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने राजधानी तेहरानमधील नरमाक आणि तेहरानपार्स भागात निदर्शकांनी सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांच्याविरोधात घोषणा दिल्याचे समोर येत आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सने केलेल्या कठोर कारवाईनंतरही निदर्शक रस्त्यावर उतरल्याचा दावा ब्रिटनस्थित इराणी वृत्तसंस्थेने केला. इराणच्या सरकारने काही शहरांमधील इंटरनेट व मोबाईलसेवा खंडीत केली. तरीही निदर्शनांवर त्याचा परिणाम झालेला नाही.

2009 साली राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदी नेजाद यांच्या सरकारविरोधात इराणमध्ये ‘ग्रीन मुव्हमेंट’चे आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाला इराणमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर इराणमध्ये महिला तसेच कामगारांचे अधिकार यावरुनही निदर्शने पेटली होती. ही सर्व निदर्शने दडपण्यात इराणच्या सरकारला यश मिळाले होते. पण गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळापासून इराणला व्यापून टाकणारे हिजाबसक्तीच्या विरोधातील आंदोलन शांत होण्याच्या तयारीत नसल्याचे दिसत आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला इराणने ताब्यात घेतलेल्या निदर्शकांना दोषी ठरवून फाशी देण्याचे सत्र सुरू केले. इराणच्या न्यायालयाने 18 हजारांहून अधिक जणांना ताब्यात घेतले असून यापैकी 45 जणांना फाशीची शिक्षा सुनाविल्याचा दावा केला जातो. यातील चार जणांना फाशी दिली असून लवकरच इतरांनाही या शिक्षेला सामोरे जावे लागेल, असे इराणने धमकावले होते. पण इराणने 45 नाही तर किमान 90 जणांना फाशीची शिक्षा सुनाविल्याचा दावा अमेरिकन वृत्तवाहिनीने केला.

याद्वारे इराण निदर्शकांमध्ये दहशत माजवित असल्याचा आरोप पाश्चिमात्य माध्यमांनी केला होता. फाशी झालेल्यांमध्ये इराणमधील प्रसिद्ध अभिनेता हुसेन मोहम्मदी याचा समावेश असल्यामुळे देशातील कलाक्षेत्रातून टीका होत आहे. इराणमधील सिनेमॅटोग्रार्फ्सच्या गटाने व्हिडिओ प्रसिद्ध करून निदर्शकांविरोधात सरकारने सुरू केलेल्या कारवाईवर टीका केली. तर दुसऱ्या बाजूला इराणमधील सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांचे समर्थक असलेल्या धार्मिक नेत्यांनी निदर्शकांना दिलेल्या फाशीला पाठिंबा दिला. त्याचबरोबर या निदर्शकांवर अधिक कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

तर गेल्या आठवड्यात इराणच्या सरकारने निदर्शकांना नवी धमकी दिली. यापुढे सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून निदर्शने करणाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले जातील, असे इराणने बजावले होते. त्यानंतर इराणच्या रस्त्यांवरील निदर्शनांची तीव्रता काही प्रमाणात ओसरली. तरीही हे आंदोलन संपले नाही. निदर्शकांनी इमारतींच्या बाल्कनी, खिडकीतून तर काही ठिकाणी छतावर चढून सरकारविरोधात घोषणा दिल्या.

या आंदोलनाला 100 दिवस पूर्ण झाले म्हणून निदर्शकांनी पुन्हा रस्त्यावर उतरून थेट इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांच्याविरोधातच घोषणा दिल्या. राजधानी तेहरानमधील तीन भागात अशा प्रकारची निदर्शने पार पाडल्याची बातमी समोर येत आहे. तर इराणच्या इतर शहरांमध्ये देखील निदर्शने आयोजित करण्यात आली होती, असा दावा ब्रिटनस्थित इराणी वृत्तसंस्थेने केला. युरोपिय देशांमध्येही इराणमध्ये सुरू असलेल्या या निदर्शनांना पाठिंबा मिळत आहे.

दरम्यान, इराणमधील सरकारविरोधात सुरू असलेली ही निदर्शने 2023 सालातही सुरू राहतील, असा इशारा आंतरराष्ट्रीय विश्लेषक देत आहेत. पुढच्या वर्षी इराणच्या सरकार हादरे देणाऱ्या निदर्शनांचा भडकाच या देशात उडेल, असे दावे या विश्लेषकांनी केले आहेत.

leave a reply