अमेरिकी संसदेकडून युक्रेनला ४७ अब्ज डॉलर्स अर्थसहाय्य पुरविणाऱ्या विधेयकाला मान्यता

वॉशिंग्टन/किव्ह – युक्रेनला ४७ अब्ज डॉलर्सचे सहाय्य पुरविण्याची तरतूद असलेल्या विधेयकाला अमेरिकी संसदेने मान्यता दिली. यात शस्त्रपुरवठा व इतर अर्थसहाय्याचा समावेश आहे. या मान्यतेनंतर अमेरिकेने युक्रेन युद्धासाठी केलेल्या तरतुदीची रक्कम १०० अब्ज डॉलर्सवर गेली आहे. यापूर्वी अमेरिकी संसदेने युक्रेनला ६५ अब्ज डॉलर्सचे सहाय्य पुरविण्यास मंजुरी दिली होती.

बुधवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचा धावता दौरा केला होता. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती, तसेच अमेरिकेच्या संसदेलाही संबोधित केले होते. अमेरिकेकडून युक्रेनला करण्यात येणारे अर्थसहाय्य व शस्त्रपुरवठा म्हणजे ‘चॅरिटी’ नसून जागतिक सुरक्षा व लोकशाहीसाठी करण्यात येणारी गुंतवणूक असल्याचा दावा युक्रेनी राष्ट्राध्यक्षांनी केला होता. बायडेन व झेलेन्स्की यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान, अमेरिकेकडून युक्रेनला ‘पॅट्रियॉट’ क्षेपणास्त्रांसह १.८५ अब्ज डॉलर्सच्या नव्या शस्त्रपुरवठ्याची घोषणाही करण्यात आली होती.

त्यानंतर आता अमेरिकेने युक्रेनला ४७ अब्ज डॉलर्सच्या अर्थसहाय्याची घोषणा करून युक्रेनमधील संघर्ष दीर्घकाळ चालू ठेवण्याचे संकेत दिले आहेत. परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी, जोपर्यंत युक्रेनला गरज आहे तोपर्यंत अमेरिका त्या देशाच्या पाठीशी असेल, अशा शब्दात नव्या सहाय्याचे समर्थन केले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेच्या नव्या सहाय्याचे स्वागत केले असून अमेरिकी संसदेचे आभार मानले आहेत. तर अमेरिकी संसदेच्या नव्या तरतुदीवर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. युक्रेनला पुरविण्यात येणारा निधी, शस्त्रे, इंटेलिजन्स, उपग्रहांकडून दिली जाणारी माहिती यासारख्या विविध घटकांच्या माध्यमातून अमेरिका रशियाविरोधात ‘प्रॉक्सी वॉर’ खेळत आहे, असा आरोप रशियाचे अमेरिकेतील राजदूत ॲनातोली ॲन्टानोव्ह यांनी केला.

दरम्यान, अमेरिकेने युक्रेन संघर्षातील ‘वॅग्नर ग्रुप’ या खाजगी रशियन संरक्षण कंपनीच्या वाढत्या सहभागावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या कंपनीने युक्रेन युद्धासाठी उत्तर कोरियाकडून शस्त्रे खरेदी केल्याचा दावाही अमेरिकी यंत्रणांनी केला आहे.

leave a reply