देशाच्या सीमा अभेद्य बनविण्यासाठी तंत्रज्ञान आणणार

- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

नवी दिल्ली – देशाच्या सीमा अभेद्य बनविण्यासाठी केंद्र सरकार तंत्रज्ञान आणत आहे. आपल्या देशाच्या वीर सैनिकांची तत्परता, सामर्थ्य याला तंत्रज्ञाची जोड मिळाली, आपल्या देशाच्या सीमा अधिक सुरक्षित करण्यास आपण सक्षम होऊ, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. पोलीस स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री शहा बोलत होते. चीन आणि पाकिस्तान कडून सीमेवर सतत कुरापती काढल्या जातात, या पार्श्वभूमीवर गृहमंत्री शहा यांनी सीमांना अभेद्य बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचे सहाय्य घेण्याची केलेली घोषणा महत्वाची ठरते.

देशाच्या सीमा अभेद्य बनविण्यासाठी तंत्रज्ञान आणणार - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा२१ ऑक्टोबर १९५९ साली लडाखच्या हॉट स्प्रिंग भागात चिनी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात १० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्यावेळी तिबेटला लागून असलेल्या २ हजार ५०० मैल सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी केंद्रीय राखीव पोलीस दलावर (सीआरपीएफ) होती. २० ऑक्टोबर १९५९ रोजी तिबेट सीमेवर तैनात सीआरपीएफचे एक पथक बेपत्ता झाले. या तुकडीला शोधण्यासाठी गेलेल्या २० पोलिसांच्या दुसऱ्या तुकडीला चिनी सैनिकांच्या गोळीबाराचा सामना करावा लागला होता. त्यावेळी भारतीय पोलीस निःशस्त्र होते. तसेच चिनी जवानांची संख्या कितीतरी अधिक होती. याच पोलीसांच्या बलिदानाची आठवण म्हणून दरवर्षी पोलीस स्मृतिदिन साजरा केला जातो.

सध्या लडाखमधील भारत-चीन सीमेवरही असाच तणाव आहे. गलवान व्हॅलीत चीनच्या विश्वासघातामुळे भारताचे २० जवान शहीद झाल्यावर भारताने येथील तैनाती व सज्जता वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी आगामी काळात भारतीय सीमा अधिक सुरक्षित बनवण्यासाठी सरकार आधुनिक तंत्रज्ञान घेऊन येत असल्याची केलेली घोषणा महत्वाची ठरते. तसेच यावेळी १९५९ च्या चीनने केलेल्या विश्वासघाताचा गृहमंत्री शहा यांनी केलेला उल्लेखाचेही महत्व वाढले आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी सेवा बजावत असताना कोरोनाची लागण होऊन मृत्यू पावलेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहिली. कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत अग्रभागी राहून सेवा बजावणाऱ्या देशाच्या पोलीस दलाचे गृहमंत्री शहा यांनी कौतुक केले. देशाच्या अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करणाऱ्या पोलिसांसमोरील आव्हाने वाढली आहेत. दहशतवाद, बनावट चलन, सायबर गुन्हे, अंमली पदार्थ, शस्त्रे आणि मानव तस्करी या आघाडीवर नवीन आव्हाने उभी राहिली आहेत. नवीन आव्हानांचा सामना करण्याकरिता देशातील पोलीस आणि निमलष्करी दलांना तयार करण्यासाठी सर्व समावेश आधुनिकीकरणाच्या कार्यक्रमावर सरकार काम करत असल्याचे गृहमंत्री शहा यांनी यावेळी जाहीर केले.

leave a reply