मुंद्रा पोर्टमध्ये सापडलेल्या अमली पदार्थांचा तपास ‘एनआयए’कडे

- टेरर फंडिंगच्या दृष्टीने तपास

नवी दिल्ली – गेल्या महिन्यात गुजरातच्या मुंद्रा पोर्टमध्ये टॅल्कम पावडरच्या आयातीच्या नावाखाली करण्यात आलेली सुमारे तीन हजार किलो हेरॉईन तस्करी उघड झाली होती. देशातीलच आतापर्यंत एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच अमली पदार्थ पकडले गेले होते. आता या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) हाती घेणार आहे. या अमली पदार्थ तस्करीमागे टेरर फंडिंगचा संशय असून यादृष्टीने एनआयए हा तपास हा घेत असल्याचे वृत्त आहे.

२१ हजार कोटी रुपयांचे हेरॉईन गुजरातमधील बंदरावरून जप्तगुजरातच्या डायरेक्टर रिव्हेन्यू ऑफ इंटेलिजन्सने (डीआरआय) कच्छमधील मुंद्रा पोर्टमध्ये कारवाई करीत २,९८८.२१ किलो, अर्थात १५ हजार कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले होेते. विजयवाडा येथील नोंदणीकृत कंपनी असलेल्या आशी ट्रेडिंग कंपनीने अफगाणिस्तानातून टॅल्कम पावडरच्या खड्यांची आयात केली होती. या खड्यांच्या आडून ही तस्करी करण्यात आली होती. इराणमार्गे जहाजातून हे हेरॉईन घेऊन कंटेनर जहाज भारतात पोहोचले होते. याआधी या कंपनीने अशाच रितीने अफगाणिस्तानातून टॅल्कम पावडर आयात केल्याचा खुलासाही झाला होता.

आतापर्यंत या तस्करीप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. यात चार भारतीय, चार अफगाण आणि एक उझबेकिस्तानच्या नागरिकाचा समावेश आहे. यानंतर अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, गांधीधाम आणि गुजरातच्या मांडवी येथे छापे मारण्यात आले आहेत. या छाप्यांमधूनही मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ पकडण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्यांमध्ये चेन्नईतील गोविंदराजू दुर्गापूर्णा वैशाली आणि तिचा नवरा मचावरम सुधाकर या जोडप्याचा समावेश आहे. मात्र हे जाळे मोठे असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे.

या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य पाहता केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय घेतला. तस्करांना अफगाणिस्तान व इराणमधून सूचना मिळत होत्या असे देखील समोर येत आहे. एनआयएने आपण या प्रकरणाचा तपास हाती घेत असल्याची माहिती बुधवारी जाहीर केली.

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यावर अमली पदार्थ तस्करीत वाढ होईल, अशी चिंता आधीच व्यक्त करण्यात आली होती. तसेच याआधी अमली पदार्थ तस्करीच्या कित्येक प्रकरणात टेटर फंडिंगची बाब उघड झाली होती. या तस्करीतून मिळणारा पैसा दहशतवादी कारवायांना पुरविण्यात येत असल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ही अमली पदार्थ तस्करी गंभीर बाब ठरते. त्यामुळे एनआयएकडे आलेल्या या तपासाचे महत्त्व वाढले आहे.

leave a reply