तालिबानचा नेता अनस हक्कानी याचे भारताच्या विरोधात जहरी फुत्कार

नवी दिल्ली – काश्मीर प्रश्‍नाशी तालिबानचा संबंध नाही. आम्हाला भारताशी उत्तम संबंध अपेक्षित आहेत, असे दावे करणार्‍या तालिबानच्या नेत्याचा खरा चेहरा समोर आला. तालिबानमधल्या हक्कानी नेटवर्कचा नेता अनस हक्कानी याने सोशल मीडियावर भारताच्या विरोधात जहरी फुत्कार टाकले आहेत. दहाव्या शतकात सोमनाथ मंदिराचा ध्वंस करणार्‍या महमूद गझनवी याच्या कबरीला भेट दिल्यानंतर, या इतिहासाची उजळणी करून अनस हक्कानी याने आपला भारतद्वेष प्रदर्शित केला.

तालिबानचा नेता अनस हक्कानी याचे भारताच्या विरोधात जहरी फुत्कारअफगाणिस्तानात तालिबानचे सरकार स्थापन करण्यासाठी वाटाघाटी सुरू असताना, हक्कानी नेटवर्कचा नेता असलेल्या अनस हक्कानी याने भारताला संदेश दिला होता. गेल्या वीस वर्षात भारताने आमच्या शत्रूला मोठे सहाय्य केले होते. ते सारे मागे टाकून आम्ही भारताशी सहकार्य करायला तयार आहोत, असे अनस हक्कानी म्हणाला होता. इतकेच नाही तर आपल्या संघटनेवर पाकिस्तानचा प्रभाव नसेल असे आश्‍वासन देऊन काश्मीरमध्ये तालिबान हस्तक्षेप करणार नाही, अशी ग्वाही अनस हक्कानी याने दिली होती. दुसर्‍या देशात हस्तक्षेप करण्याचे तालिबानचे धोरण नसल्याचे सांगून हक्कानी याने हे दावे केले होते.

अफगाणिस्तानवरील तालिबानचा ताबा हे वास्तव आहे. ते नाकारता येणार नाही. म्हणूनच भारताने तालिबानशी चर्चा करण्याची तयारी ठेवावी, असा सल्ला काही विश्‍लेषकांनी दिला होता. अनस हक्कानी याने त्यावेळी दिलेल्या आश्‍वासनाच्या पार्श्‍वभूमीवर, भारताला तालिबानच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अशी चर्चाही सुरू झाली होती. पण तालिबानबाबत भारताने दाखविलेला सावधपणा योग्यच होता, हे आता स्पष्ट झाले आहे. अनस हक्कानी याने विद्वेषी फुत्कार टाकून ही बाब सिद्ध केली.

भारताने आपल्या अफगाणिस्तानातील राजवटीला मान्यता द्यावी, यासाठी तालिबानची धडपड सुरू होती. भारताने अफगाणी जनतेला आधीप्रमाणे सहाय्य करावे, असे आवाहन तालिबानकडून केले जात आहे. पण तालिबानने अजूनही दहशतवाद सोडून दिलेला नसून तालिबानच्या राजवटीत दहशतवाद हेच अफगाणिस्तानचे राष्ट्रीय धोरण असेल, हे उघड झाले आहे. विशेषतः पाकिस्तानचा हस्तक मानला जाणारा हक्कानी नेटवर्क हा गट सध्या तालिबानमध्ये सर्वाधिक प्रबळ असल्याने, भारताला तालिबानवर विश्‍वास ठेवता येणार नाही, हे स्पष्ट झालेले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर अनस हक्कानी याची ही विद्वेषी वक्तव्ये प्रसिद्ध झाल्यानंतर, भारतीयांनी त्याला जळजळीत प्रत्युत्तर दिले. घोरी, गझनवी आणि तैमूर या भारतावर आक्रमण करणार्‍या लुटारूंनी वसविलेली शहरे आज भूकेकंगाल बनलेली आहेत. पण भारताचे सोमनाथ मंदिर दिमाखात उभे आहे, याकडे भारतीयांनी लक्ष वेधले.

अनस हक्कानी याची ही चिथावणीखोर विधाने समोर येत असताना, अफगाणिस्तानातील शीखधर्मियांच्या प्रार्थनास्थळाची मोडतोड करण्यात आल्याची प्रक्षोभक बातमी आली आहे. यामुळे तालिबानला भारताकडून मान्यता व सहाय्य मिळण्याची शक्यता निकालात निघालेली आहे. त्याचवेळी भारताबरोबर सहकार्य करण्यासाठी खरोखरच प्रमाणिक प्रयत्न करणार्‍या तालिबानमधल्या गटाकडून हक्कानी नेटवर्कला विरोध होण्याची शक्यता यामुळे बळावली आहे.

leave a reply