हिजबुल्लाह, हमास, हौथी बंडखोरांना हाताशी धरून इराण आखातात क्षेपणास्त्रांचे जाळे उभारत आहे

- इराणमधील सरकारसंलग्न माध्यमांचा दावा

क्षेपणास्त्रांचे जाळेतेहरान – आखाती देशांमध्ये ड्रोन्सचे नेटवर्क यशस्वीरित्या उभारल्यानंतर इराण ‘इंटिग्रेटेड मिसाईल नेटवर्क’ अर्थात क्षेपणास्त्रांचे एकिकृत जाळे उभारण्याच्या तयारीत आहे. लेबेनॉनमधील हिजबुल्लाह, गाझापट्टीतील हमास, इस्लामिक जिहाद, येमेनमधील हौथी तर इराकमधील हशद या गटांना क्षेपणास्त्रे व त्यांचे तंत्रज्ञान पुरवून इराण हे नेटवर्क उभारीत आहे. इराणमधील सरकारसंलग्न माध्यमांनी ही घोषणा करून अमेरिका, इस्रायल आणि आखातातील अमेरिकेच्या इतर मित्रदेशांना इशारा दिल्याचे दिसत आहे.

१९८०च्या दशकात इराकबरोबर पेटलेल्या युद्धामध्ये इराणच्या लष्कराकडील क्षेपणास्त्रे अतिशय कुचकामी ठरली होती. त्यानंतर इराणने सोव्हिएत रशिया तसेच चीनच्या सहाय्याने आपला क्षेपणास्त्र कार्यक्रम उभारण्यास सुरुवात केली होती. आज इराण क्षेपणास्त्र तसेच ड्रोन तंत्रज्ञानाने सज्ज असलेला आखातातील एकमेव देश आहे. आखातातील अरब देश अजूनही क्षेपणास्त्र सज्जतेसाठी अमेरिका व इतर देशांवर अवलंबून आहेत. त्यामुळे क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सच्या आघाडीवर इराणने या क्षेत्रात मोठी आघाडी घेतल्याचा दावा इराणमधील सरकारसंलग्न माध्यमे करीत आहेत.

इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक मानले जाणाऱ्या हसन तेहरानी मोघद्दम यांनी १९८०च्या दशकातच लेबेनॉनमध्ये हिजबुल्लाहसाठी क्षेपणास्त्रांचे युनिट उभारले होते, अशी माहिती ‘तेहरान टाईम्स’ने दिली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे हिजबुल्लाह यशस्वीरित्या इस्रायलला उत्तर देत असल्याचा दावा इराणी वर्तमानपत्राने केला. त्याचबरोबर गाझापट्टीतील हमास, इस्लामिक जिहाद व इराकमधील हशद या दहशतवादी संघटना आणि येमेनमधील हौथी बंडखोर संघटनांना देखील इराणने शस्त्रसज्ज केल्याची माहिती या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केली.

तर इराणने आखातातील आपल्या ‘रेझिस्टन्स फ्रंट’ला क्षेपणास्त्रांच्या निर्मितीचे तंत्रज्ञान पुरविल्याचा दावा इराणमधील आणखी एका वृत्तसंस्थेने केला. या ‘रेझिस्टन्स फ्रंट’मध्ये इराणसंलग्न हिजबुल्लाह, हमास, इस्लामिक जिहाद, सिरियातील अस्साद राजवट तसेच इराकमधील इराणसंलग्न संघटनांचा समावेश होतो. २००६ साली इस्रायलबरोबरच्या युद्धामध्ये इराणने पुरविलेल्या क्षेपणास्त्रांचा हिजबुल्लाहने वापर केल्यानंतर जगभरात याची दलख घेण्यात आली होती. त्यानंतर इराणने पुरविलेल्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हिजबुल्लाहने आपल्या क्षेपणास्त्रांच्या मारक क्षमतेत वाढ केल्याचे या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

हिजबुल्लाहप्रमाणे सिरियन लष्कराने दहशतवादविरोधी कारवाईत तसेच येमेनमधील हौथींनी सौदी अरेबिया व युएईवरील हल्ल्यांसाठी या क्षेपणास्त्रांचा वापर केला होता, असा लक्षवेधी उल्लेख या वृत्तसंस्थेने केला. याआधी इराणने आपले ड्रोन्सचे नेटवर्क उभारले होते. लेबेनॉन, सिरिया तसेच येमेनमध्ये इराणच्या ड्रोन्सचे जाळे उभारल्याचा दावा ही दोन्ही माध्यमे करीत आहे. लवकरच इराण आपल्या ‘रेझिस्टन्स फ्रंट’च्या सहाय्याने आखातात क्षेपणास्त्रांचे एकिकृत जाळे उभारेल. असे झाल्यास इराणच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या अमेरिका, इस्रायल व आखातातील अमेरिकेच्या मित्रदेशांना आव्हान देता येईल, असा दावा इराणी माध्यमे करीत आहेत.

leave a reply