राष्ट्राध्यक्ष अस्साद यांच्या युएई दौर्‍यानंतर इराणचे परराष्ट्रमंत्री सिरियात दाखल

दमास्कस – सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-अस्साद यांनी युएईचा दौरा केल्यामुळे इराण अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अमिरअब्दोल्लाहियान यांनी तातडीने सिरियाचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष अस्साद यांची भेट घेतली. सिरिया व अरब देशांमध्ये प्रस्थापित होत असलेल्या संबंधांवर चर्चा पार पडल्याचे इराणने म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात सिरियन राष्ट्राध्यक्ष बशर अल-अस्साद यांनी युएईचा दौरा करून पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल-मखतूम आणि क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झाएद यांची भेट घेतली होती. या भेटीत दोन्ही देशांमध्ये नव्याने सहकार्य प्रस्थापित करण्यावर प्रदीर्घ चर्चा पार पडली होती. सिरिया, युएई तसेच अरब देशांच्या माध्यमांनी या भेटीला मोठी प्रसिद्धी दिली होती.

२०११ साली सिरियामध्ये राष्ट्राध्यक्ष बशर अल-अस्साद यांच्या राजवटीविरोधात बंडखोरांनी शस्त्रे हातात घेतली होती. अस्साद यांची राजवट वाचविण्यासाठी रशिया, इराण या संघर्षात उतरले. तर अस्साद राजवटीविरोधात संघर्ष करणार्‍या बंडखोरांच्या मागे अमेरिका, युरोपिय मित्रदेश तसेच सौदी अरेबिया, युएई व इतर अरब देशांनी आपले समर्थन उभे केले होते. सुरुवातीच्या काळात अस्साद राजवटीची मोठी पिछेहाट झाली खरी. पण रशिया या संघर्षात उतरल्यानंतर अस्साद राजवटीची सिरियातील पकड मजबूत बनली.

या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर, युएई तसेच अन्य अरब देशांनी सिरियाबरोबरचे संबंध तोडले होते. तसेच अरब लीगमधूनही सिरियाला बहिष्कृत करण्यात आले होते. पण गेल्या आठवड्यात सिरियन राष्ट्राध्यक्षांनी युएईचा दौरा केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध पूर्वपदावर येत असल्याचे दिसत आहे. राष्ट्राध्यक्ष अस्साद यांचा युएई दौरा व त्यांनी क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांच्याबरोबर झालेल्या भेटीवर अमेरिकेने टीका केली होती.

अशा परिस्थितीत, इराणचे परराष्ट्रमंत्री अमिरअब्दोल्लाहियान यांनी बुधवारी सिरियाचा तातडीचा दौरा केला. सिरियन परराष्ट्रमंत्री फैसल मेकदाद यांनी विमानतळावर जाऊन इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचे स्वागत केले. त्यानंतर अमिरअब्दोल्लाहियान यांनी सिरियन राष्ट्राध्यक्षांची भेट घेऊन वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा केल्याचे इराण तसेच सिरियन सरकारने जाहीर केले. यामध्ये अरब देशांबरोबरच्या संबंधांपासून ते युक्रेन युद्धापर्यंतच्या मुद्यांचा समावेश होता, असे इराणने म्हटले आहे.

इराण तसेच सिरियन सरकारने याबाबत अधिक माहिती दिलेली नाही. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी शर्म अल-शेखमध्ये इजिप्तसह इस्रायल व युएईच्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. इराणच्या वाढत्या धोक्याविरोधात संयुक्त सुरक्षा धोरण राबविण्यावर इस्रायल, युएई व इजिप्तच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्याचबरोबर गेल्या अकरा वर्षांच्या बहिष्कारानंतर सिरियाला अरब लीगमध्ये सामील करुन घेऊन सिरियाला इराणपासून वेगळे करण्याचा मुद्दाही या चर्चेत उपस्थित केल्याचा दावा इस्रायली माध्यमांनी केला आहे.

leave a reply