युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर चीनच्या हल्ल्याचा धोका वाढल्याने तैवानकडून सक्तीच्या लष्करी सेवेचा कालावधी वाढविण्याचे संकेत

तैपेई/बीजिंग – रशियाने युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर चीन तैवानवर हल्ला करण्याची शक्यता असल्याचे माध्यमे व विश्‍लेषक वारंवार बजावत आहेत. या पार्श्‍वभूमीवर तैवानने आपली संरक्षणक्षमता अधिक भक्कम करण्यासाठी पावले उचलली असून सक्तीच्या लष्करी सेवेचा कालावधी वाढविण्याचे संकेत दिले आहेत. तैवानचे संरक्षणमंत्री चिउ कुओ-चेंग यांनी ही माहिती दिली. दरम्यान, मंगळवारी तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन व जपानचे माजी पंतप्रधान शिन्झो ऍबे यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

गेल्या काही महिन्यात चीनने ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रातील आपल्या कारवाया अधिक आक्रमक केल्या आहेत. तैवानविरोधात सातत्याने युद्धसरावांचे आयोजन करण्यात येत असून आग्नेय आशियाई देशांनाही धमकावण्यात येत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते व लष्करी अधिकारी वारंवार तैवानच्या विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित करून आक्रमक वक्तव्ये करीत आहेत. त्याचवेळी चीनने तैवानविरोधातील ‘ग्रे झोन वॉरअफेअर’ची व्याप्तीही वाढविली आहे.

रशियाने युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्यानंतर चीनदेखील तैवानसाठी असेच पाऊल उचलू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. चीनच्या आक्रमक हालचालींमुळे यात अधिकच भर पडली आहे. या पार्श्‍वभूमीवर तैवानने आपली संरक्षणक्षमता वाढविण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. देशातील नागरिकांना सक्तीची लष्करी सेवा त्याचाच एक भाग आहे. सध्या या सेबेचा कालावधी चार महिन्यांचा आहे. यापूर्वी हा कालावधी दोन वर्षांचा होता. मात्र तरुणांना खूष करण्यासाठी सरकारने कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला होता.

चीनच्या वाढत्या धोक्यामुळे त्यात पुन्हा बदल करण्याची तयारी सुरू झाली आहे. राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी लष्करी सुधारणांसाठी पुढाकार घेतला असून त्यात कालावधीत वाढ करण्याच्या मुद्याचाही समावेश आहे. तैवान सरकारने यासंदर्भात एक समितीही नेमली असून या समितीचा अहवाल आल्यानंतर लष्करी सेवेचा कालावधी वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे संरक्षणमंत्री चिउ कुओ-चेंग यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन व जपानचे माजी पंतप्रधान शिन्झो ऍबे यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा झाल्याचे समोर आले आहे. अर्धा तास चाललेल्या या चर्चेत जपान व तैवानमधील सहकार्य तसेच इंडो-पॅसिफिकच्या मुद्यावर बोलणी झाल्याची माहिती तैवानी सूत्रांनी दिली. यावेळी जपानच्या माजी पंतप्रधानांनी आपण लवकरच तैवानला भेट देऊ असे संकेत दिले आहेत. ऍबे व तैवानच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये झालेल्या चर्चेवरून चीनने नाराजी व्यक्त केली असून जपानच्या नेत्यांनी तैवानमधील स्वातंत्र्यवादी गटांशी हातमिळवणी करु नये, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने बजावले.

leave a reply