इराणने माजी उपसंरक्षणमंत्र्यांना फाशी दिली

- घृणास्पद कारवाई केल्याची ब्रिटनची टीका

तेहरान/लंडन – आंतरराष्ट्रीय इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून इराणने देशद्रोहाचा आरोप असलेल्या आपल्याच देशाचे माजी उपसंरक्षणमंत्री अलीरेझा अकबरी यांना फाशी दिली. इराणच्या सरकारसंलग्न वृत्तसंस्थांनी ही माहिती उघड केली. इराणशी द्रोह करून अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीझादेह यांच्या हत्येसाठी ब्रिटीश गुप्तचर यंत्रणेला सहाय्य केल्याचा ठपका इराणने अलीरेझा यांच्यावर ठेवला होता. ब्रिटीश नागरिकत्व असलेल्या अलीरेझा यांना फाशी देऊन इराणने घृणास्पद कारवाई केल्याची टीका ब्रिटनने केली. दरम्यान, गेल्या चार महिन्यांपासून इराणमध्ये राजवटीच्या विरोधात सुरू असलेली निदर्शने रोखण्यात मिळालेले अपयश झाकणअयासाठी अलीरेझा यांना इराणच्या राजवटीने ही शिक्षा दिल्याचे आरोप होत आहेत.

निदर्शकांना फाशीची शिक्षा देऊन इराणची राजवट आपल्या विरोधातील आंदोलन चिरडू पाहत आहे. तसेच निदर्शनांचे समर्थन करणाऱ्या माजी राष्ट्राध्यक्ष अली अकबर रफसंजानी यांच्या कन्येला पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावून इराणच्या राजवटीने कुणाचीही गय गेली जाणार नसल्याचा संदेश दिला होता. पण आता माजी उपसंरक्षणमंत्री अलीरेझा यांच्यावर देशद्रोहाचा गंभीर आरोप ठेवून इराणच्या राजवटीने त्यांना फाशीची शिक्षा दिली. याचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटले आहेत. ब्रिटनसह अमेरिकेने देखील याचा निषेध नोंदविला आहे.

ब्रिटीश नागरिकाला फाशी देऊन घृणास्पद कारवाई करणाऱ्या इराणविरोधात अतिशय कठोर कारवाईची आवश्यकता असल्याचे ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री जेम्स क्लेव्हर्ली यांनी म्हटले आहे. राजकीय सूडापोटी ही कारवाई करून आपल्यादेखत मानवी जीवाला काडीचीही किंमत नाही, हे इराणने दाखवून दिल्याचे जेम्स म्हणाले. इराणने अलीरेझा यांना फाशीची शिक्षा दिल्यास तेहरानमधील ब्रिटनच्या राजदूताला माघारी बोलाविण्यात येईल, असा इशारा ब्रिटनने दिला होता. त्यामुळे अलीरेझा यांना फाशी दिल्यानंतर ब्रिटनच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे. अमेरिकेने देखील अलीरेझा यांना दिलेल्या फाशीचा निषेध करून इराणवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

1997 ते 2005 या कालावधीत अलीरेझा इराणचे उपसंरक्षणमंत्री होते. याच काळात त्यांनी इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा काऊन्सिलचे प्रमुख अली शामखानी यांच्याशी जवळीक साधली होती. अलीरेझा यांनी उपसंरक्षणमंत्रीपदाचा गैरफायदा घेत ब्रिटीश गुप्तचर यंत्रणा ‘एमआय6’साठी एजंट अर्थात हेर म्हणून काम केल्याचा ठपका इराणने ठेवला आहे.

2019 सालीच इराणने अलीरेझा यांना अटक केली होती. पण आपल्या बंदिस्त व्यवस्थेसाठी प्रसिद्ध असलेल्या इराणने अलीरेझा यांच्या अटकेची माहिती लपवून ठेवली होती. याच आठवड्यात इराणच्या सरकारी वृत्तसंस्थांनी अलीरेझा यांची अटक, त्यांच्यावरील आरोप व फाशीची शिक्षा याची माहिती उघड करून खळबळ उडवून दिली होती. या बातमीतून इराण सावरलाही नव्हता तोच शनिवारी अलीरेझा यांना फाशी दिल्याचे जाहीर केले. इराणमध्ये राजवटीच्या विरोधात आंदोलन धुमसत असताना इराणने माजी उपसंरक्षणमंत्री अलीरेझा यांच्यावरील कारवाईची माहिती उघड करून कुणाचीही पर्वा करणार नसल्याचे बजावल्याचे दिसत आहे.

दरम्यान, इराणची राजवट निदर्शकांविरोधात फाशीच्या शिक्षेचा शस्त्रासारखा वापर करीत असल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रसंघाने केला आहे. तर 1979 साली इराणमधील इस्लामी क्रांतीत सहभागी झालेले वरिष्ठ नेते अबोलफझल घादियानी यांनी निदर्शकांना फाशी देणाऱ्या इराणच्या नेतृत्वावर खळबळजनक आरोप केले आहेत. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी हे अत्याचारी, हुकूमशाह, सत्तालोलूप आणि रक्तपिपासू असल्याचा गंभीर आरोप केला.

leave a reply