आम्ही अणुबॉम्ब खायचा का?

-पाकिस्तानच्या सरकारला जनतेचा सवाल

अणुबॉम्बइस्लामाबाद – पाकिस्तानसाठी मित्रदेशांकडे हात पसरताना आपल्याला लाज वाटत आहे, असे हताश उद्गार पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी काढले आहेत. पाकिस्तानकडील परकीय गंगाजळी पाच अब्ज डॉलर्सवर आली असून अवघ्या काही दिवसांची आयात यातून करता येऊ शकेल. अशा स्थितीत सौदी अरेबिया आणि युएई या मित्रदेशांचे दौरे करून पाकिस्तानचे पंतप्रधान व लष्करप्रमुख मदतीची याचना करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आपण मित्रदेशांकडे भीक मागत आहोत, याची कबुली देऊन त्यावर खंत व्यक्त केली. मात्र सध्याच्या स्थितीत पाकिस्तानसमोर दुसरा पर्यायच नसल्याचे शरीफ यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानात अन्नधान्यासाठी हाणामारी सुरू झाली असून यात काहीजणांचा बळी गेल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. माफक दरात गव्हाचे पीठ मिळवण्यासाठी कित्येक तास रांगेत उभे राहून पाकिस्तानची जनता हैराण झाली असून उपासमारीचे भयंकर संकट या देशावर कोसळले आहे. पाकिस्तानात अणुबॉम्ब आहे, पण तो आम्ही खायचा का? असा प्रश्न एका संतप्त नागरिकाने केला. आपल्या देशाचे राज्यकर्ते आमच्याकडे अणुबॉम्ब आहे, हे मोठ्या अभिमानाने सांगत आहेत. पण जनतेचे पोट भरत नसेल, तर त्याचा उपयोगच काय? असा सवाल या नागरिकांने माध्यमांकडे केला. तर सोशल मीडियावर पाकिस्तानच्या काही नेटकरांनी माजी पंतप्रधान झुल्फिखार अली भुत्तो यांच्या विधानांची आठवण करून दिली.

एकवेळ आम्ही गवत खाऊन दिवस ढकलू किंवा उपाशी देखील राहू, पण अणुबॉम्ब मिळविल्याखेरीज पाकिस्तान स्वस्थ बसणार नाही, अशी गर्जना भुत्तो यांनी केली होती. त्यानुसार पाकिस्तानने अणुबॉम्ब बनवला खरा. पण आता खरोखरच उपासमारीचे वेळ आमच्यावर ओढावलेली आहे, असे सोशल मीडियावर असलेले पाकिस्तानी हताशपणे सांगत आहेत. अन्नधान्याची टंचाई व उपासमारीचे परिणाम पाकिस्तानच्या खैबर-पख्तुनख्वा, सिंध आणि बलोचिस्तान प्रांतात झाले असून इथे अन्न मिळवण्यासाठी गदारोळ माजला आहे. यात काहीजणांचा बळी गेला असून मोठ्या प्रमाणात हाणामारी सुरू असल्याचे व्हिडिओज्‌‍ सातत्याने प्रसिद्ध होत आहेत. पाकिस्तानात महागाईचा दर 24 टक्क्यांच्याही पुढे गेला असून आशिया खंडात सर्वाधिक महागाई भडकलेल्या देशांच्या यादीत श्रीलंकेनंतर पाकिस्तानचा क्रमांक लागला आहे.

गव्हाच्या पीठाचे वीस किलोचे पोते 3100 पाकिस्तानी रुपयांना मिळत असून हा भाव देण्याची तयारी असूनही काहीजणांना गव्हाचे पीठ मिळत नाही. कांद्यांचे दर पाकिस्तानात आधीच्या तुलनेत 500 टक्क्यांनी वाढले आहेत. इतर आवश्यक वस्तूंच्या टंचाई आणि दरवाढीने पाकिस्तानची अवस्था बिकट बनली असून अन्न मिळवण्यासाठी पाकिस्तानचे नागरिक सैरावैरा पळत असल्याचे दिसते आहे. याचे भयंकर सामाजिक व राजकीय परिणाम देखील समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानला मित्रदेशांनी मिळून 9 अब्ज डॉलर्सचे सहाय्य घोषित केले होते. पण हे सहाय्य पूरग्रस्तांसाठी असल्याचे उघड झाले व पुढच्या तीन वर्षात टप्प्याटप्प्याने हे सहाय्य मिळणार असल्याचे उघड झाल्यानंतर पाकिस्तानी जनतेची उरलीसुरली आशाही संपुष्टात आली आहे. जनता अशा स्थितीत असताना देखील, भारतात अगदी माफक दरात उपलब्ध असलेले अन्नधान्य, भाजीपाला व इतर आवश्यक गोष्टींची आयात करण्यास या देशाचे सरकार तयार नाही. कारण पाकिस्तानचा विरोधी पक्ष याची वाट पाहत असून हा निर्णय घेतल्यास आपल्यावर जोरदार टीका होईल, या भीतीने पाकिस्तानच्या सरकारला ग्रासलेले आहे. पाकिस्तानचा विरोधी पक्ष देखील या आघाडीवर सरकारला कुठल्याही प्रकारची सवलत द्यायला तयार नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या जनतेच्या वाट्याला येत असलेल्या हालअपेष्टांच्या मागे असलेल्या इतर कारणांबरोबरच पराकोटीचा भारतद्वेष हे देखील या देशाच्या आजच्या अवस्थेचे प्रमुख कारण असल्याचे दिसते.

leave a reply