इराण आखातातील प्रमुख खलनायक आणि सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका

- अमेरिकेचे मावळते सेंटकॉम प्रमुख

प्रमुख खलनायकजेरुसलेम – इराण हा आखातातील मुख्य खलनायक तसेच या क्षेत्रातील सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोकादायक देश आहे. इराणला अणुबॉम्ब मिळू नये यासाठी अमेरिका आवश्यक ते सर्व काही करील, अशी घोषणा अमेरिकेचे मावळते सेंटकॉम प्रमुख जनरल केनिथ मॅकेन्झी यांनी केली. अमेरिका आणि पाश्चिमात्य देश इराणबरोबर अणुकरार करण्याच्या अतिशय जवळ येऊन पोहोचल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेच्याच सेंटकॉम प्रमुखांनी इराणबाबत केलेली विधाने लक्षवेधी ठरतात. गेल्या आठवड्यातच ‘ई३’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या युरोपमधील ब्रिटन, फ्रान्स व जर्मनी या देशांच्या राजनैतिक अधिकार्‍यांनी इराणबरोबरचा अणुकरार संपन्न होणार असल्याचे जाहीर केले. यासाठी शेवटच्या टप्प्यातील हालचाली सुरू असल्याचे संकेत अमेरिका व युरोपिय देशांनी दिले होते. पण इराणबरोबरचा अणुकरार आपल्या पाठिंब्याखेरीज होऊ शकत नसल्याचे रशियाने फटकारले. अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी युक्रेन संघर्षाप्रकरणी रशियावर लादलेले निर्बंध या अणुकराराच्या आड येऊ शकतात, असा इशारा रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरॉव यांनी दिला होता. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी रशियाचे दावे धुडकावले होते. युक्रेनमधील युद्धासाठी रशियावर लादलेले निर्बंध आणि इराणचा अणुकरार यांच्यामध्ये तार जोडण्याची आवश्यकता नाही, असे ब्लिंकन म्हणाले होते. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड-सेंटकॉम’चे मावळते प्रमुख जनरल केनिथ मॅकेन्झी यांनी इस्रायलचा दौरा केला. यावेळी जनरल मॅकेन्झी याने इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट, संरक्षणमंत्री बेनी गांत्ज आणि संरक्षणदलप्रमुख अविव कोशावी यांची भेट घेतली. इराणचा अणुकरार, आखाती क्षेत्रातील इराणसंलग्न दहशतवादी संघटना आणि युक्रेन-रशिया संघर्ष, यावर जनरल मॅकेन्झी यांनी आपली भूमिका मांडली.

इराणपासून आखाती क्षेत्राच्या सुरक्षेला धोका असल्याचे जनरल मॅकेन्झी यांनी यावेळी मान्य केले. इराण या क्षेत्रातील मुख्य खलनायक असल्याचे जनरल मॅकेन्झी यांनी इस्रायली वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले. इराणपासून या क्षेत्रालाच नाही, तर आंतरराष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे व इराणवर विश्वास ठेवता येणार नसल्याचे सेंटकॉमच्या प्रमुखांनी अधोरेखित केले. मात्र यावेळी जनरल मॅकेन्झी यांनी बायडेन प्रशासनाची इराणबाबतची भूमिका थोडक्यात स्पष्ट केली. अमेरिका इराणचा अणुकार्यक्रम रोखू शकणार नाही, पण इाणला अडवण्यासाठी अमेरिका प्रयत्न करणार असल्याचे जनरल मॅकेन्झी यांनी या मुलाखतीत सांगितले. इस्रायल तसेच अरब मित्रदेशांच्या सुरक्षेला धोका ठरणार्‍या हमास, हिजबुल्लाह, हौथी तसेच इराक-सिरियातील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांबाबतही बायडेन प्रशासनाची ही भूमिका असल्याचे सेंटकॉमचे प्रमुख म्हणाले. या दहशतवादी संघटनांना रोखता येणार नाही पण त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी बायडेन प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मॅकेन्झी यांनी दिली. जनरल मॅकेन्झी यांचे इराणला रोखता येणार नाही, पण अडवण्याचे प्रयत्न करू, असे सांगणारी विधाने बायडेन प्रशासनाची इराणधार्जिणी भूमिका स्पष्ट करणारी आहे. इस्रायलच्या भेटीवर असताना, जनरल मॅकेन्झी यांच्याकडून कुठल्याही परिस्थितीत इराणला अण्वस्त्रसज्ज बनू देणार नाही, याची ग्वाही देणे अपेक्षित होते. याआधी बायडेन प्रशासनाने इस्रायलची सुरक्षा धोक्यात येऊ देणार नाही, अशी आश्‍वासने दिली होती. पण आता ही हमी देखील बायडेन प्रशासन देऊ शकणार नाही, असे संकेत जनरल मॅकेन्झी यांच्या विधानातून मिळत आहेत. यामुळे अमेरिका व इस्रायलमधील दरी अधिकाधिक रुंदावत असल्याचे स्ष्टपणे दिसू लागले आहे.

leave a reply