युक्रेनमधील युद्धातून भारताला महत्त्वाचा धडा मिळाला

– लष्करप्रमुख जनरल नरवणे

नवी दिल्ली – पुढचे युद्ध सायबर क्षेत्रात होईल की एअर कंडिशन रूममध्ये बसून लढले जाईल, असा प्रश्‍न लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांना माध्यमांनी केला. सायबर व ड्रोन्सद्वारेच पुढची युद्ध लढली जातील, असे दावे केले जातात. त्या तर्काच्या आधारावर हा प्रश्‍न विचारण्यात आला होता. पण जनरल नरवणे यांनी युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा दाखला देऊन, आजही पारंपरिक युद्ध पेट घेऊ शकते, असे बजावले. देशातच तयार झालेल्या शस्त्रास्त्रांद्वारे युद्ध लढायला हवे, हा फार मोठा धडा भारताला युक्रेनमधील युद्धातून मिळालेला आहे, असे लक्षवेधी विधान यावेळी लष्करप्रमुखांनी केले.

war-in-Ukraineयुद्ध कुठल्याही क्षणी पेट घेऊ शकते. त्याला तोंड देण्यासाठी आपण सज्ज असलेच पाहिजे. हे युद्ध दुसर्‍या देशातून आलेली शस्त्रास्त्रे व संरक्षण यंत्रणांच्या आधारावर खेळता येणार नाही. त्यासाठी देशातच तयार झालेल्या संरक्षणसाहित्य व शस्त्रास्त्रांचा वापर व्हायला हवा. हा फार मोठा धडा युक्रेनमधील या युद्धाने भारताला दिला आहे. त्याचवेळी कायम युद्धसज्ज राहण्याची आवश्यकताही युक्रेनमधील या युद्धाने आपल्याला दाखवून दिली आहे, असे जनरल नरवणे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. सायबर तसेच ड्रोन्स व इतर आधुनिक माध्यमातून युद्ध होऊ शकते. त्याचवेळी पारंपरिक युद्धाची शक्यता निकालात निघालेली नाही, हे जनरल नरवणे यांनी यावेळी लक्षात आणून दिले.

भारत गेल्या काही वर्षांपासून संरक्षणसाहित्याच्या देशांतर्गत निर्मितीसाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. या प्रक्रियेत खाजगी उद्योगक्षेत्राला सहभागी करून घेण्यात आले असून यामुळे देशातील संरक्षणसाहित्याच्या व शस्त्रास्त्रांच्या निर्मितीचा वेग प्रचंड प्रमाणात वाढला आहे. भारतीय लष्कर, वायूसेना आणि नौदल देखील संरक्षणसाहित्य तसेच शस्त्रास्त्रांच्या देशांतर्गत निर्मितीला प्रचंड प्रमाणात वेग देण्याची मागणी करीत आहे. युक्रेनमधील युद्धाचा दाखला देऊन लष्करप्रमुखांनी याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केल्याचे दिसते.

युद्धाच्या काळात भारत दुसर्‍या देशातून आयात केलेल्या शस्त्रांवर विसंबून राहू शकणार नाही, हे जनरल नरवणे यांनी याआधीही बजावले होते. रशियन आक्रमणाचा मुकाबला करण्यासाठी युक्रेनकडे पुरेसे लष्करी सामर्थ्य नव्हते आणि यासाठी युक्रेन अमेरिका व नाटोवर अवलंबून होता. पण अमेरिकेकडून युक्रेनला अपेक्षित सहाय्य मिळाले नाही आणि त्यामुळे युक्रेनचा प्रतिकार तोकडा पडल्याचे उघड झाले होते. याचा दाखला देऊन लष्करप्रमुख संरक्षणसाहित्य तसेच शस्त्रास्त्रांच्या निर्मितीच्या आघाडीवर देशाच्या आत्मनिर्भरतेचे महत्त्व पटवून देत आहेत.

leave a reply