रियाध – सौदी अरेबियाची राजधानी रियाधमधील दूतावास सुरू करण्यासाठी इराणने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे शिष्टमंडळ सौदीमध्ये दाखल झाले आहे. येत्या काही दिवसात इराणचे परराष्ट्रमंत्री देखील सौदीला भेट देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सौदीने इराणप्रमाणे सिरियाबरोबरील संबंध पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून सिरियाचे परराष्ट्रमंत्र्यांनी सौदीला भेट दिली आहे.
गेल्या आठवड्यात सौदी अरेबिया आणि इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दूतावास सुरू करून राजकीय व्यवहार सुरळीत करण्यावर भर दिला होता. यासाठी बुधवारी इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे विशेष शिष्टमंडळ सौदीमध्ये दाखल झाले. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासिर कानी यांनी याची माहिती दिली. इराण-सौदीमधील राजनैतिक सहकार्य सुरू करण्याबाबतच्या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी हे शिष्टमंडळ रियाधमध्ये उतरल्याचे कानी म्हणाले.
यानंतर पुढच्या काही तासात रियाधमधील इराणच्या दूतावासाचे मुख्य द्वार काही अंशी खुले करण्यात आले होते. यावेळी मालवाहू वाहनाने इराणच्या दूतावासात प्रवेश केल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सौदी व इराणमध्ये संबंध सुरळीत करण्यासाठी ज्या वेगाने हालचाली होत आहेत, ते पाहता इराण लवकरच रियाधमधील दूतावास सुरू करू शकतो. त्याचबरोबर जेद्दामधील उच्चायुक्तालय सुरू करण्याचे संकेतही इराणने दिले आहेत. इराणमधील आपल्या दूतावासाबाबत सौदीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
२०१६ साली सौदीने शियापंथिय धार्मिक नेत्याला फाशीची शिक्षा दिल्यानंतर खवळलेल्या इराणने रियाध तसेच जेद्दामधील आपले दूतावास तसेच उच्चायुक्तालय बंद करण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर तेहरानमधील सौदीच्या दूतावासावर निदर्शकांनी हल्ला चढविला होता. त्यानंतर गेली काही वर्षे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. येमेनमधील हौथी बंडखोरांना इराण शस्त्रसज्ज करीत असल्याचा आरोप सौदीने केला होता. सौदीपाठोपाठ इतर अरब मित्रदेशांनीदेखील इराणरोबरचे सहकार्य तोडले होते. त्यामुळे आखातात सौदी व इराण असे दोन गट तयार झाले होते.
मात्र गेल्या महिन्यात चीनने सौदी व इराणमध्ये घडविलेल्या मध्यस्थीनंतर दोन्ही देश संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सौदीने सिरियातील इराणसमर्थक अस्साद राजवटीबरोबरही नव्याने सहकार्य प्रस्थापित केले आहे. यासाठी बुधवारी सिरियाचे परराष्ट्रमंत्री फैझल मकदाद यांनी जेद्दा येथे सौदीचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल यांची भेट घेतली. त्यामुळे आखातातील दोन गटातील तणाव कमी होत चालल्याचे संकेत मिळत आहेत.