उत्तर कोरियाकडून लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी

जपानच्या सरकारचे नागरिकांना स्थलांतराचे आदेश

korea missileसेऊल/टोकिओ – उत्तर कोरियाच्या हुकूमशाही राजवटीने गुरुवारी आणखी एका बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. सुमारे एक हजार किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास केल्यानंतर सदर क्षेपणास्त्र ‘ईस्ट सी’मध्ये कोसळले. पण उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्राचा रोख ‘होकाईदो’ प्रांताकडे असल्याची चिंता व्यक्त करून जपानने येथील जनतेला गर्दीची ठिकाणे खाली करुन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आदेश दिले. यामुळे होकाईदोच्या रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता. तसेच जपानच्या सरकारने आपल्या लष्कराला आवश्यक त्या कारवाईसाठी सज्ज राहण्याची सूचना केली होती.

range missileगुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. दरवेळेप्रमाणे उत्तर कोरियाने या क्षेपणास्त्राचे तपशील जाहीर करण्याचे टाळले. पण दक्षिण कोरियाच्या लष्कराने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने नेहमीपेक्षा वेगळ्या, नव्या आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. याआधी उत्तर कोरियाने प्रक्षेपित केलेली बहुतांश क्षेपणास्त्रे द्रव-इंधनावर आधारीत होती. पण गुरुवारी प्रक्षेपित केलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र घन-इंधनावर आधारीत होते, अशी माहिती दक्षिण कोरियाच्या लष्कराने दिली.

द्रव-इंधनाच्या तुलनेत घन-इंधनावर आधारीत क्षेपणास्त्रांचा वेग अधिक असतो आणि ही क्षेपणास्त्रे स्फोटके सहजपणे वाहून नेऊ शकतात. त्यामुळे उत्तर कोरियाने नव्या प्रकारच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याचा दावा दक्षिण कोरियन लष्कर करीत आहे. पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांखाली असलेल्या उत्तर कोरियाने आपल्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात केलेली ही प्रगती धक्कादायक असल्याचे दक्षिण कोरियाच्या लष्करी विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर उत्तर कोरियाची क्षेपणास्त्रे या क्षेत्रात तणाव वाढवीत असल्याची जाणीव दक्षिण कोरियाचे लष्कर तसेच विश्लेषक करीत आहेत.

japan streetsगुरुवारी सकाळी उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र प्रक्षेपित केल्यानंतर पुढच्या काही मिनिटात जपानने होकाईदो प्रांतातील आपल्या नागरिकांसाठी अलर्ट जारी केला. पुढील दोन-तीन मिनिटात उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानच्या हद्दीत शिरण्याची चिंता व्यक्त करुन जपानने होकाईदो प्रांतातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याची सूचना केली. त्यामुळे होकाईदो प्रांतात नागरिकांची धावपळ उडाली होती. पण उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्रे जपानच्या हवाई हद्दीत शिरण्याआधीच कोसळल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मात्र उत्तर कोरियाची ही क्षेपणास्त्र चाचणी चिथावणी देणारी होती, अशी टीका दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने केली. तर जपानच्या सरकारने उत्तर कोरियाची ही चाचणी प्रक्षोभक आणि या क्षेत्रातील तणाव वाढविणारी असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्रांना उत्तर देण्याची तसेच कोणत्याही आकस्मिकतेची तयारी ठेवावी, असे आदेश जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी दिले आहेत. दरम्यान, उत्तर कोरिया तसेच चीनच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा धोका अधोरेखित करून जपानच्या सरकारने ‘बॉम्ब शेल्टर्स’ उभारण्याची सूचना केली आहे. अमेरिका, रशियाप्रमाणे आपल्या देशात जनतेच्या सुरक्षेसाठी बॉम्ब शेल्टर्स नसल्याची चिंता जपानचे नेते व्यक्त करीत आहेत. राजधानी टोकिओसह इतर प्रमुख शहरांबरोबरच अतिदूर अंतरावरील गावातील जनतेसाठी देखील अशा निवासाची सोय करण्यात यावी, यासाठी जपानने पावले उचलली आहेत. चीन आणि उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र हल्ल्यांचा धोका नाकारता येणार नाही, याची खात्री जपानला पटल्याचे दिसत आहे.

leave a reply