इराण अल कायदाच्या दहशतवाद्यांचे नवे माहेरघर

- अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांचा आरोप

वॉशिंग्टन – इराण अल कायदाच्या दहशतवाद्यांसाठी नवे माहेरघर ठरत आहे. अल कायदाचे दहशतवादी इराणमधील बिळात दडून असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे अवघड बनत चालले आहे, असा आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केला. २०१५ साली अमेरिकेने इराणबरोबर केलेल्या अणुकरारानंतर इराण आणि अल कायदाचे संबंध सुधारल्याचे पॉम्पिओ म्हणाले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात इराणमध्ये अल कायदाचा दुसर्‍या क्रमांकाचा नेता ‘अबू मुहम्मद अल-मसरी’ याला ठार करण्यात आले. इस्रायलच्या एजंट्सनी मसरीला ठार केल्याची बातमी अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केली होती. या कारवाईमुळे अल कायदाचे दहशतवादी इराणमध्ये आश्रय घेऊन असल्याचे उघड होत असल्याचा दावा सदर वर्तमानपत्राने केला होता. पण इराण, इस्रायल तसेच अमेरिकेने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी मंगळवारी वॉशिंग्टन येथील ‘नॅशनल प्रेस क्लब’ येथे बोलताना, इराणने अल कायदाच्या दहशतवाद्यांना आश्रय दिला आहे, असे जाहीर केले. अल-मसरीची इराणमधील उपस्थिती इराण आणि अल कायदातील संबंधांवर शिक्कामोर्तब करणारी घटना असल्याचे पॉम्पिओ म्हणाले.

‘अल कायदाच्या दहशतवाद्यांसाठी इराण हाच नवा अफगाणिस्तान आहे. अफगाणिस्तानमध्ये अल कायदाचे दहशतवादी डोंगरांमध्ये दडून असायचे. पण इराणमध्ये हे दहशतवादी इराणी राजवटीने पुरविलेल्या सुरक्षाकड्यात फिरतात’, असा ठपका पॉम्पिओ यांनी ठेवला. इराणमधूनच अल कायदाचे नेते आपल्या दहशतवादी कारवायांसाठी निधी उभा करतात, जगभरातील कमांडर्सशी संपर्क करतात. याआधी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये हे दहशतवादी नेते जे काही करीत होते, तेच आता ते इराणमधून करीत असल्याचे पॉम्पिओ म्हणाले.

तर २०१५ साली अमेरिकेने इराणबरोबर अणुकरार केल्यानंतर इराणने अल कायदाच्या दहशतवाद्यांना आपल्या देशात मुख्यालय उभे करू दिले. हे अल कायदाचे दहशतवादी इराणच्या इशार्‍यावर काम करीत असून तिथून ते अमेरिका आणि पाश्‍चिमात्य देशांवर हल्ले चढवू शकतात, असा इशाराही अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिला.

दरम्यान, काही तासांपूर्वीच परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी इराणवर रासायनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती, तस्करी आणि वापराचा आरोप केला होता. त्याचबरोबर पॉम्पिओ यांनी इराणवर नवे निर्बंधही जाहीर केले आहेत.

leave a reply