होलोकास्ट नाकारणाऱ्या मानसिकतेमुळेच इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देता येणार नाही

- इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख अविव कोशावी

अविव कोशावीजेरूसलेम/तेहरान – ‘सामान्य माणूस म्हणून दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझी जर्मनीचा हुकूमशहा हिटलरने ज्यूवंशियांवर केलेल अनन्वित अत्याचार जाणून घेण्यासाठी इतिहासकार किंवा संशोधक असण्याची आवश्यकता नाही. इतिहासातील हे वेदनादायी सत्य नाकारणारा कुठलाही देश सर्वसंहारक शस्त्रांनी सज्ज झालेला परवडणार नाही. अशा देशावर विश्वास ठेवता येणार नाही’, असा इशारा इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख अविव कोशावी यांनी दिला.

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेसाठी रवाना होण्याआधी रविवारी अमेरिकी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी हिटलरने केलेल्या ज्यूंच्या वंशसंहारावर संशय व्यक्त केला. ‘इतिहासात घडून गेलेल्या घटनांची संशोधक आणि इतिहासकारांकडून सविस्तर चौकशी व्हायला हवी. ही घटना घडल्याचे काही संकेत मिळतात. तसे असेल तर याची चौकशी करा’, अशी मागणी करून राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी ज्यूंचा वंशसंहारावर प्रश्न उपस्थित केल्याचा दावा अमेरिकी वृत्तवाहिनीने केला.

पुढच्या काही तासातच यावर इस्रायलमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांनी ज्यूंचा वंशसंहार नाकारणारा इराण आणि या देशाच्या अणुकार्यक्रमावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले. तर ज्यूंचा वंशसंहार आणि इस्रायलचे अस्तित्व नाकारणाऱ्या इराणच्या राष्ट्राध्यक्षांना इस्रायलद्वेष पसरविण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मंचाचा वापर करू देऊ नका, अशी मागणी राष्ट्रसंघातील इस्रायलचे राजदूत गिलाड एर्डन यांनी केली. इराणमध्ये कत्तली घडविणाऱ्या रईसी यांना संबोधनासाठी परवानगी दिली तर संयुक्त राष्ट्रसंघाची प्रतिष्ठा अधिकच घसरेल, असे एर्डन यांनी बजावले आहे.

leave a reply