घातपाताचा कट उधळण्यासाठी इस्रायली लष्कर सिरियात शिरले

सिरियात शिरलेतेल अविव/लंडन – आत्तापर्यंत सिरियात हवाई हल्ले चढविणाऱ्या इस्रायलच्या लष्कराने सिरियात घुसून कारवाई केली. इस्रायलच्या सीमेजवळ बॉम्ब फेकणाऱ्या हल्लेखोरांना पकडण्यासाठी इस्रायलचे जवान सिरियात शिरले होते, अशी माहिती इस्रायली लष्करानेच दिली. या कारवाईत एका हल्लेखोराला अटक करून इस्रायलमध्ये आणले असून अन्य हल्लेखोर पसार झाल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले.

इस्रायलच्या लष्कराने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी गोलान टेकड्यांच्या सीमेजवळ संशयास्पद हालचाली सुरू होत्या. इस्रायली जवानांनी टेहळणी उपकरणांद्वारे केलेल्या पाहणीनंतर सिरियन सीमेत वावरणाऱ्या चारजणांनी इस्रायलच्या गोलान भागात ‘अँटी-पर्सनल माईन्स’ फेकल्याचे निदर्शनास आले. त्याबरोबर इस्रायली जवानांच्या तुकडीने सिरियाच्या हद्दीत घुसून हल्लेखोरांचा पाठलाग केला. यावेळी इस्रायली जवानांनी केलेल्या गोळीबारात एक हल्लेखोर गंभीर जखमी झाला. या हल्लेखोराला जखमी अवस्थेत इस्रायलच्या ‘बरुच पदेह मेडिकल सेंटर’मध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

2018 साली गोलान टेकड्यांजवळ पहारा देणाऱ्या सिरियन जवानांवर इस्रायली लष्कराने गोळीबार केला होता. 1967 सालच्या अरब देशांबरोबरच्या सहा दिवसांच्या युद्धात इस्रायलने सिरियाच्या ताब्यातील गोलान टेकड्या ताब्यात घेतल्या होत्या. त्यावर इस्रायलचा नाही, तर सिरियाचा अधिकार असल्याचे दावे सिरियाकडून सातत्याने केले जातात. त्याला इराण व इराणसंलग्न हिजबुल्लाह संघटनेचेही जोरदार समर्थन मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, गोलान टेकड्यांबाबत इस्रायल अतिशय संवेदनशीलता दाखवित असून इथल्या सिरिया, इराण व हिजबुल्लाहच्या कारवायांचा मुद्दा इस्रायल आपल्या राष्ट्रीय सुरक्षेशी जोडत आहे.

leave a reply