संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेतील भाषणात इराणच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेवर घणाघाती टीका

अमेरिकेवर घणाघाती टीकासंयुक्त राष्ट्रसंघ – इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी संयुक्त राष्ट्रसंघातील आपल्या भाषणात अमेरिकेवर घणाघाती हल्ला चढविला. मानवाधिकारांपासून ते दहशतवादापर्यंतच्या मुद्यावर अमेरिका आणि पाश्चिमात्यांची भूमिका दुटप्पी असल्याचे सांगून अमेरिकेनेच ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेची निर्मिती केल्याचा गंभीर आरोप राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी केला. या दहशतवादी संघटनेच्या विरोधात लढणारे इराणचे जनरल कासेम सुलेमानी यांची हत्या अमेरिकेने घडविली होती. याची आठवण करून देऊन इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी सुलेमानी यांचा फोटो फडकावला. तसेच अणुकराराबाबतची हमी मिळाल्याखेरीज इराण अमेरिकेवर विश्वास ठेवणार नाही, असे इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या भाषणात ठासून सांगितले.

सध्या इराणमध्ये जोरदार निदर्शने सुरू असून इराणच्या महिलांनी हिजाबच्या विरोधात संघर्ष सुरू केला आहे. या आंदोलनात 22 वर्षाच्या माहसा अमिनी नावाच्या तरुणीचा बळी गेला. त्यानंतर इराणच्या महिलांमध्ये संतापाची लाट उसळली असून राजवटीच्या विरोधातील जनभावना अधिक प्रकर्षाने जगासमोर येत आहे. इराणच्या महिलांनी सुरू केलेल्या या आंदोलनाला जगभरातून प्रतिसाद मिळत आहे. पाश्चिमात्यांनीही हा मुद्दा उचलून धरला असून इराणच्या राजवटीविरोधात खड्या ठाकलेल्या इतर घटकांचाही या आंदोलनातील सहभाग वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी संयुक्त राष्ट्रसंघातील आमसभेला संबोधित करून मानवाधिकारांच्या मुद्यावर अमेरिका आणि पाश्चिमात्यांची भूमिका दुटप्पी असल्याची सडकून टीका केली.

पाश्चिमात्यांकडून केल्या जाणाऱ्या मानवाधिकारांच्या हननाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते, असा मुद्दा उपस्थित करून माहसा अमिनीच्या मृत्यूला पाश्चिमात्य अवास्तव महत्त्व देत असल्याचा ठपका राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी ठेवला. इतर देशांमधल्या मानवाधिकारांचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या पाश्चिमात्य देशांनीच केलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाचे काय? असा सवाल यावेळी रईसी यांनी केला. कॅनडाच्या मूळ निवासींवर झालेल्या अत्याचारांकडे पाश्चिमात्यांनी दुर्लक्ष केले, ही बाब यावेळी रईसी यांनी लक्षात आणून दिली.

अमेरिका आपल्या हितसंबंधांसाठी दहशतवादी संघटनांची निर्मिती करते, असा गंभीर आरोप करून ‘आयएस’च्या स्थापनेमागे अमेरिकाच असल्याचे इब्राहिम रईसी म्हणाले. या दहशतवादी संघटनेच्या विरोधात लढणारे इराणजे जनरल कासेम सुलेमानी यांना अमेरिकेने संपविले, याचा दाखला इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला. त्यांच्या या टीकेमुळे अमेरिका व पाश्चिमात्य देशांच्या इराणबरोबरील अणुकराराची शक्यता खूपच मागे पडल्याचे दिसत आहे.

अणुकरारासाठी इराण अमेरिकेवर विश्वास ठेवायला तयार नाही. हा अणुकरार मागे घेतला जाणार नाही, याची हमी मिळाल्याखेरीज इराण अणुकरारासाठी तयार होणार नाही, असे रईसी यांनी ठासून सांगितले. तर बायडेन प्रशासनाने इराणला अशी हमी देणे शक्य नसल्याचे बजावले आहे. यामुळे सध्या तरी पाश्चिमात्य देश व इराणमधील अणुकराराचा मुद्दा मागे पडल्याचे दिसत आहे. फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्री कॅथरिन कोलोना यांनी इराणच्या अणुकरारासाठीची संधीची खिडकी बंद होत चालल्याचे बजावले होते. मात्र इराणच्या राष्ट्राध्यक्षांचे आमसभेतील आक्रमक भाषण पाहता, इराण ही संधी साधण्यासाठी उत्सुक नसल्याचे संकेत मिळत आहेत. याचे राजकीय व सामरिक पातळीवर फार मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

leave a reply