संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जपान व दक्षिण कोरियाच्या राष्ट्रप्रमुखांची भेट

राष्ट्रप्रमुखांची भेटन्यूयॉर्क – जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक-योल यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध व सहकार्य अधिक दृढ करण्यावर एकमत दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली. 2019 सालानंतर दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी एकमेकांची प्रत्यक्षात भेट घेण्याची ही पहिलीच वेळ ठरते. ठोस निकालांसाठी आम्ही पहिले पाऊल उचलले आहे, अशा शब्दात दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तत्कालिन जपानी राजवटीने कोरियन जनतेवर केलेले अत्याचार व त्यासंदर्भात जपानच्या नंतरच्या राजवटींनी घेतलेली भूमिका हा दोन्ही देशांमध्ये सातत्याने कळीचा मुद्दा ठरला आहे. 2018 साली दक्षिण कोरियाच्या न्यायालयाने ‘फोर्स्ड लेबर’च्या ुद्यावरून जपानच्या दोन कंपन्यांना मोठी नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले होते. त्यापाठोपाठ दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मून जे-इन यांनी जपानच्या आर्थिक सहाय्यावर उभारण्यात आलेल्या एका संस्थेचे मान्यता रद्द केली होती.

यावर जपानकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. जपानने दक्षिण कोरियाला करण्यात येणाऱ्या निर्यातीवर निर्बंध टाकले होते. कोरियानेही जपानविरोधात व्यापारी बॉयकॉटचे पाऊल उचलले होते. यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये जबरदस्त तणाव निर्माण झाला होता. चीन, उत्तर कोरिया व तैवानसारख्या मुद्यांवर दोन्ही देशांची भूमिका समान असली तरी द्विपक्षीय संबंधांमधील तणाव कायम राहिला होता. या तणावावर अमेरिकेने तीव्र शब्दात चिंता व्यक्त केली होती. चीनविरोधात पॅसिफिक देशांची आघाडी उघडण्याचे प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेकडून या दोन देशांमध्ये मध्यस्थीचेही प्रयत्न झाले होते.

2019 साली जपानचे तत्कालिन पंतप्रधान शिंझो ॲबे व कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मून जे-इन यांची चीनमध्ये भेट झाली होती. मात्र द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत कोणतीही ठोस चर्चा न झाल्याने तणाव कायम राहिला होता. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत दोन्ही देशांच्या नेत्यांची झालेली भेट लक्ष वेधून घेणारी ठरते. यामागे दक्षिण कोरियाच्या नव्या राष्ट्रप्रमुखांनी घेतलेला पुढाकार कारणीभूत ठरल्याचा दावा माध्यमांनी केला आहे.

leave a reply