इराणने आपल्या अंडरग्राऊंड हवाईतळाची माहिती उघड केली

तेहरान – लढाऊ तसेच बॉम्बर विमाने आणि ड्रोन्सची तैनाती असलेला अंडरग्राऊंड हवाईतळ आपल्याकडे असल्याची घोषणा इराणने केली. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने या छुप्या हवाईतळाचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले. यामध्ये शत्रूची हवाई सुरक्षा भेदू शकणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या लढाऊ विमानाचाही समावेश होता. त्यामुळे या बातमीद्वारे इराणने आपल्याविरोधात बॉम्बर्स विमानांसह युद्धसराव करणाऱ्या अमेरिका व इस्रायलला इशारा दिल्याचा दावा केला जातो. आपले लष्करी तळ हल्ले चढवून लक्ष्य केले तरी या छुप्या तळांच्या सहाय्याने आपल्या शत्रूदेशांना प्रत्युत्तर देईल, असा संदेश याद्वारे इराणने दिल्याचे दिसत आहे.

iran underground air baseआठवड्यापूर्वी इराणच्या इस्फाहन येथील क्षेपणास्त्रांच्या निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर ड्रोन्सचे हल्ले झाले. इराणच्या मध्यभागी असलेल्या या कारखान्यावर झालेल्या हल्ल्यासाठी इस्रायल व देशांतील कुर्द बंडखोर जबाबदार असल्याचा आरोप इराणच्या यंत्रणांनी केला होता. इराणने देखील इस्फाहनवरील हल्ल्याला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला होता. याआधी इराणच्या किनारपट्टीजवळील शहरांवर ड्रोन्सचे हल्ले झाले होते. यासाठी इराणने इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादला जबाबदार धरले होते. पण इस्फाहन शहर मध्य इराणमध्ये आहे. त्यामुळे इस्फाहनवर हल्ला चढवून इराणच्या शत्रूंनी आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन केल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत होते.

iran undergroundत्यानंतर अमेरिका व इस्रायलच्या लढाऊ आणि बॉम्बर्स विमानांनी युद्धसराव सुरू केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याचबरोबर इराणच्या अणुकार्यक्रमाच्या मुद्यावर इस्रायल व पाश्चिमात्य देशांमध्ये एकमत असल्याची घोषणा करुन इस्रायलने इराणवरील दबाव वाढविल्याचा दावा केला जात होता. पण मंगळवारी इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने ‘ओकाब ४४’ अर्थात ‘ईगल ४४’ या पहिल्या अंडरग्राऊड हवाईतळाची बातमी व त्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केली. इराणच्या लष्कराने या हवाईतळाचे ठिकाण उघड केलेले नाही. पण इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचे प्रमुख मेजर जनरल मोहम्मद बाकेरी आणि मेजर जनरल अब्दुलरहिम मुसावी यांनी या छुप्या हवाईतळाला भेट दिल्याचेही यात दिसत आहे.

या छुप्या हवाईतळात शस्त्रसज्ज झालेली लढाऊ विमाने दिवसा-रात्री, कुठल्याही परिस्थितीत सहजरित्या संचलन करून भरारी घेऊ शकतात, असा संदेश इराणने व्हिडिओतून दिला आहे. डोंगरांनी घेरलेला आणि डोंगरांच्या आत इराणच्या हवाईदलाचा हा सर्वात मोठा अंडरग्राऊंड हवाईतळ असल्याचे सदर वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या काही दशकांपासून इराण अशा भूमीगत लष्करी तळांवर काम करीत असल्याची माहिती इराणी वृत्तसंस्थेने दिली. काही वर्षांपूर्वी इराणने अंडरग्राऊंड लष्करी तळावर क्षेपणास्त्रांचे युनिट तैनात केल्याचे फोटोग्राफ्स व व्हिडिओज्‌‍ प्रसिद्ध केले होते. तर गेल्या वर्षी मे महिन्यात इराणने आणखी एका अंडरग्राऊंड तळावर टेहळणी व हल्लेखोर ड्रोन्स तैनात केल्याचेही जाहीर केले होते. शत्रूची क्षेपणास्त्रे आमचे हे अंडरग्राऊंड तळ भेदू शकत नसल्याचा दावा इराण करीत आहे.

leave a reply