तुर्की-सिरियातील भूकंपातील बळींची संख्या पाच हजारांच्याही पुढे

डब्ल्यूएचओने २० हजारावर बळी जाण्याची भीती वर्तविली

turkey quakeअंकारा – तुर्की आणि सिरियात हाहाकार माजविणाऱ्या भूकंपामधील बळींची संख्या ५,२००हून अधिक असल्याची विदारक बाब समोर आली आहे. तर जखमींची संख्या २६ हजारांच्याही पुढे गेली आहे. दोन्ही देशांमध्ये साचलेल्या बर्फामुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याचे सांगितले जाते. तर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) तुर्की व सिरियामधील या भूकंपांमुळे सुमारे २० हजार जणांचा बळी जाईल, अशी थरकाप उडविणारी शक्यता वर्तविली आहे. मंगळवारीही तुर्कीला भूकंपाचे सुमारे २०० धक्के बसले आहेत. पण त्याची तीव्रता नसल्याने यामुळे अधिक हानी झालेली नाही.

सोमवारी पहाटेच्या सुमारास तुर्की व सिरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे दोन्ही देशांची वाताहत झाली असून या देशांमधल्या हजारो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. यामुळे एक कोटी, ३५ लाख जण बाधित झाले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची संख्या मोठी असल्याचे सांगितले जाते. सोमवारच्या भूकंपानंतर तुर्कीमध्ये सुमारे २०० वेळा नव्या भूकंपाची नोंद झाली. हे आधी झालेल्या भूकंपाच्या परिणामस्वरुप बसणारे धक्के असल्याने यामुळे विशेष हानी झालेली नाही. पण या धक्क्यांमुळे बचावकार्य बाधित झाले. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फ साचल्याने देखील बचावकार्यात अडचणी येत आहेत. तसेच भूकंपामुळे काही ठिकाणी गॅस पाईपलाईनचे स्फोट झाल्याच्याही बातम्या आहेत. यामुळे आग भडकून झालेल्या जीवितहानीच माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण तशी दाट शक्यता माध्यमांकडून वर्तविली जाते.

turkey-syria earthquakeइथले नागरिक अजूनही भूकंपाच्या धक्क्यातून सावरलेले नसून त्यांच्यावर फार मोठा मानसिक आघात झालेला आहे. जगभरातील प्रमुख देशांनी तुर्कीमधील बचावकार्यासाठी आपली पथके रवाना केली. यामध्ये भारत आघाडीवर असून भारताचे सी-१७ ग्लोबमास्टर हे अवजड वाहतूक करणारे लष्करी विमान तुर्कीत दाखल झाले आहे. यातएनडीआरएफचे १०१ जवान व लष्कराच्या पॅरामेडिकल विभागाच्या जवानांचा तसेच एक्स रे मशिन्स, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स इत्यादी साहित्याचा समावेश आहे. भारतातील तुर्कीचे राजदूत फिरात सनेल यांनी या सहाय्यासाठी भारताचे आभार मानले. दोस्त हा भारतीय व तुर्कीच्या भाषेत समान शब्द असल्याचे सांगून मित्रच्या मदतीला मित्र धावून येतोच, असा भावपूर्ण संदेश तुर्कीच्या राजदूतांनी दिला.

मात्र भारत हे बचावकार्य घेऊन पाठवित असलल्या सी-१७ विमानासाठी आपली हवाई हद्द खुली करण्यास पाकिस्तानने नकार दिला होता. त्यामुळे वेगळ्या हवाई मार्गाने भारताच्या विमानाला हा प्रवास करावा लागला आणि त्यामुळे तुर्कीपर्यंत हे सहाय्य पोहोचण्यास अधिकच विलंब झाला. याचे पडसाद भारतात उमटत असून सोशल मीडियावर भारतीयांनी याविरोधात संताप व्यक्त केला. तसेच काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या तुर्कीला निदान आत्ता तरी समज आली असेल, अशी अपेक्षा भारतीय नेटकरांनी व्यक्त केली आहे.

leave a reply