चीनच्या मध्यस्थीने इराण व सौदीचे संबंध सुधारण्यावर एकमत

- इराणच्या वृत्तवाहिनीचा दावा

दुबई – गेल्या सात वर्षांपासून इराण आणि सौदी अरेबियामध्ये बिघडलेले संबंध पूर्ववत करण्यावर दोन्ही देशांमध्ये एकमत झाले आहे. आखातातील या दोन्ही स्पर्धक देशांमध्ये चीनने मध्यस्थी घडवून आणल्याची माहिती इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने दिली. यामुळे गेल्या काही वर्षांपासून इराण व सौदीमध्ये सुरू असलेला उघड लष्करी संघर्ष तसेच छुप्या कारवाया बंद होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.

चीनच्या मध्यस्थीने इराण व सौदीचे संबंध सुधारण्यावर एकमत - इराणच्या वृत्तवाहिनीचा दावाचीनमध्ये सुरू असलेल्या नॅशनल पिपल्स काँग्रेसच्या बैठकीदरम्यान इराण व सौदीच्या अधिकाऱ्यांमध्ये विशेष चर्चा पार पडली. चीनचे माजी परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी इराण व सौदीमध्ये मध्यस्थी केली. या चर्चेचे फोटोग्राफ्स व व्हिडिओ इराणच्या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले आहेत. इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा काऊन्सिलचे प्रमुख अली शामखानी आणि सौदीचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मुसाद बिन मोहम्मद अल-एबन यांनी या चर्चेत सहभाग घेतला होता.

गेल्या चार दिवसांपासून चीनच्या मध्यस्थीने इराण व सौदीच्या अधिकाऱ्यांमध्ये ही बैठक सुरू होती. यावेळी दोन्ही देशांमध्ये संबंध सुरळीत करण्यावर एकमत झाल्याचे इराणी वृत्तवाहिनीने म्हटले आहे. चीनमधील बैठकीनंतर लवकरच इराण व सौदीचे परराष्ट्रमंत्री व राजनैतिक अधिकाऱ्यांमध्ये स्वतंत्र बैठका पार पडतील. दोन्ही देशांमधील दूतावास पुन्हा सुरू करण्यावर यावेळी चर्चा होईल, असा दावा इराणी वृत्तवाहिनीने केला. पुढील दोन महिन्यात यावर निर्णय जाहीर केला जाईल.

इराण व सौदीमधील संबंध सुरळीत करण्यासाठी चीनने केलेल्या प्रयत्नांचे इराणमधून स्वागत होत आहे. पण यामागे चीनचा स्वार्थ असल्याचा दावा केला जातो. इराण व सौदीमधील इंधन व इंधनवायूचे साठे मिळविण्यासाठी चीनच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात इंधनाचे संकट निर्माण झाले आहे. या काळात अमेरिका आणि सौदी व अरब मित्रदेशांमधील संबंध बिघडले आहेत. याचा फायदा घेऊन चीन सौदी व अरब मित्रदेशांमधील आपली गुंतवणूक वाढवून अमेरिकेचा प्रभाव कमी करण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा केला जातो. अशा परिस्थितीत, सौदी व इराणमधील संबंध सुरळीत झाले तर चीनला याचा सर्वाधिक फायदा होईल, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

हिंदी

 

leave a reply