तेल अविव – युक्रेनवर हल्ला चढविण्यासाठी रशिया इराणकडून अधिकाधिक ड्रोन्स मिळविण्याच्या तयारीत असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी हा आरोप करून रशिया व इराणमधील या सहकार्यावर गंभीर चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर इस्रायलच्या एका ‘थिंक टँक’ने इराणच्या रिव्होल्युनशरी गार्ड्सच्या भूमीगत ड्रोन तळाची माहिती उघड केली आहे. या तळांवर रिव्होल्युशनरी गार्ड्सने ड्रोन्सचे स्वार्म तयार ठेवलेल्या आहेत, असे या थिंक टँकने आपल्या अहवालात बजावले आहे. हा तळ होर्मुझच्या आखातापासून जवळ असल्याने यापासून सर्वच आखाती क्षेत्राला फार मोठा धोका असल्याचा गंभीर इशारा ‘अल्मा सेंटर’ या अभ्यासगटाने दिला आहे.
इराण युक्रेनवर हल्ले चढविण्यासाठी रशियाला मोठ्या प्रमाणात ड्रोन्सचा पुरवठा करीत असल्याचा आरोप अमेरिका करीत आहे. इतकेच नाही तर होर्मुझच्या आखातातील इराणच्या कारवाया चिंताजनक स्तरावर पोहोचल्याचेही अमेरिकेचे म्हणणे आहे. म्हणूनच अमेरिकेने आपली युद्धनौका आखाती क्षेत्रात रवाना करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर, इराणच्या भूमीगत ड्रोन तळाची माहिती देऊन इस्रायलच्या ‘अल्मा सेंटर’ने यासंदर्भातील अमेरिकेची चिंता अधिकच वाढविल्याचे दिसते. इस्रायलच्या उत्तर सीमेकडून संभवणाऱ्या धोक्यांची माहिती देणारा स्वतंत्र अभ्यासगट अशी अल्मा सेंटरची ओळख आहे.
फार्स प्रांतातील शिराज येथील झार्गो पर्वतराजीजवळ रिव्होल्युशनरी गार्ड्ने हा ड्रोनचा तळ उभारला आहे. इथे मोठ्या प्रमाणात लढाऊ विमानांचीही तैनाती करण्यात आलेली आहे. त्याचवेळी इथे विविध प्रकारच्या ड्रोन्सचे स्वार्म अर्थात डोन्सचे समुह तयार ठेवण्यात आलेले आहेत. त्याचे कमांड अँड कंट्रोल सेंटर या तळावर असल्याचे या अभ्यासगटाने म्हटले आहे. हा तळ शिराज विमानतळापासून सुमारे दहा किलोमीटर इतक्या अंतरावर असल्याची माहिती देऊन अल्मा सेंटरने याचे ‘सॅटेलाईट फुटेज’ प्रसिद्ध केले आहेत.
अमेरिका इराणच्या ड्रोन्सवर चिंता व्यक्त करीत असताना, प्रसिद्ध झालेली ही माहिती लक्षवेधी ठरते. डावपेचांच्या दृष्टीने विचार करायचा झाला, तर इराणचा हा भूमीगत ड्रोन तळ होर्मुझच्या आखातापासून खूपच जवळ आहे, याकडे अल्मा सेंटरने लक्ष वेधले. त्यामुळे केवळ इस्रायलच नाही, तर संपूर्ण आखाती क्षेत्राला याचा धोका संभवतो, असे अल्मा सेंटरचे म्हणणे आहे. इस्रायलपासून इजिप्तच्या कैरोपर्यंत मारा करणारे युएव्हीज् इराणकडे असताना, या तळाला फार मोठे सामरिक महत्त्व असल्याचे सदर अभ्यासगटाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
याआधी इराणच्या ड्रोन तळांवर इस्रायलने हल्ले चढविल्याच्या बातम्या गेल्या वर्षाच्या मार्च महिन्यात प्र्रसिद्ध झाल्या होत्या. इस्रायलने अधिकृत पातळीवर या हल्ल्याची कबुली दिलेली नसली तरी यात इराणचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. इराणने याचा सूड घेण्याच्या धमक्याही दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर, इराणच्या भूमीगत ड्रोन तळाची उघड झालेली ही माहिती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरते. विशेषतः अमेरिकेकडून इराणच्या विरोधात येत असलेले इशारे पाहता, इस्रायलच्या अभ्यासगटाने दिलेल्या या माहितीचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे.
हिंदी