येमेनी बंडखोरांसाठी शस्त्रास्त्रे घेऊन जाणारे इराणचे जहाज ब्रिटनच्या नौदलाने ताब्यात घेतले होते

britain-navyदुबई – या वर्षाच्या सुरूवातीला येमेनमधील हौथी बंडखोरांसाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा घेऊन जाणारे इराणचे जहाज ब्रिटनच्या नौदलाने ताब्यात घेतले होते. ओमानच्या आखातात ब्रिटनच्या नौदलाने ही कारवाई केल्याची माहिती, ब्रिटनच्या युएईमधील दूतावासाने दिली. यामुळे सौदी अरेबिया व युएई या देशांवर हल्ले चढविणाऱ्या हौथी बंडखोरांना इराण शस्त्रसज्ज करीत असल्याच्या आरोपांना दुजोरा मिळाला आहे. इराणबरोबरील अणुकरारावर अमेरिक व पाश्चिमात्य देशांबरोबरील वाटघाटी फिस्कटल्यानंतर, ब्रिटनने उघड केलेली ही माहिती लक्षवेधी ठरते.

2015 सालापासून येमेनमधील सत्तासंघर्षात सौदीने उडी घेऊन येमेनमधील हौथी बंडखोरांवर हल्ले चढविले होते. हौथी बंडखोरांनी त्याला प्रत्युत्तर दिले व हे युद्ध सात वर्षाहून अधिक काळ लांबले. येमेनी बंडखोरांना इराणचे पाठबळ असून इराणच त्यांना पैसा व शस्त्रास्त्रे पुरवित असल्याचा आरोप केला जातो. इराणने आपल्यावरील हे आरोप सातत्याने नाकारले होते. अमेरिका व युरोपिय देशांनीही सौदीच्या इराणवरील या आरोपांकडे फारसे गंभीरपणे पाहिले नव्हते. ज्यो बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर त्यांनी येमेनी बंडखोरांना दहशतवाद्यांच्या यादीतून वगळले होते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे.

Iranian-shipया वर्षाच्या सुरूवातीला ओमानच्या आखातात ब्रिटनच्या रॉयल नेव्हीने इराणचे जहाज ताब्यात घेतले. यावर येमेनी बंडखोरासांठी इराणने पाठविलेला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा साठा होता, अशी माहिती युएईतील ब्रिटनच्या दूतावासाने उघड केली. यामुळे इराणवर सौदी तसेच युएई आणि इतर आखाती देशांनी केलेल्या आरोपांना दुजोरा मिळाला आहे. कतारची राजधानी दोहा येथे इराणची अमेरिक व युरोपिय देशांबरोबर अणुकरारावर चर्चा झाली होती. इराणने ताठर भूमिका स्वीकारल्याने ही चर्चा फिस्कटल्याचा आरोप केला जातो. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी इराणच्या जहाजावर आपल्या नौदलाने केलेल्या कारवाईची माहिती ब्रिटनने उघड केली, हा योगायोग ठरत नाही. याद्वारे ब्रिटनने इराणला इशारा दिल्याचे स्पष्टपणे दिसते आहे.

पुढच्या काळात इराणने आपल्या अणुकार्यक्रमावर तडजोड करण्याची तयारी दाखविली नाही, तर इराणच्या विरोधात कठोर कारवाई केली जाऊ शकते, असा संदेश ब्रिटनने दिला आहे. मात्र इराणने अणुकार्यक्रमाबाबत स्वीकरलेली आक्रमक भूमिक लक्षात घेता, इराणच्या धोरणावर याचा फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही.

leave a reply