अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर इतर देशांवरील हल्ल्यांसाठी होऊ देणार नाही

-तालिबानच्या प्रमुखाची ग्वाही

काबुल – अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दुसऱ्या देशावर हल्ला चढविण्यासाठी होऊ देणार नाही, अशी ग्वाही तालिबानचा प्रमुख हेबतुल्लाह अखुंदझादा याने दिली आहे. याबरोबरच अफगाणिस्तानला सर्वच शेजारी देश व आंतरराष्ट्रीय समुदायाशी उत्तम संबंध प्रस्थापित करायचे आहेत, असा संदेश हेबतुल्लाह याने दिला. मात्र अफगाणिस्तानच्या अंतर्गत कारभारात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असे अखुंदझादा याने बजावले आहे.

Afghanistan-soilतालिबानची राजवट आल्यानंतर अफगाणिस्तानात दहशतवादी संघटनांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे अफगाणिस्तानच्या शेजारी देशांना असलेला धोका वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जाते. तसेच तालिबानने अजूनही अल कायदासारख्या खतरनाक दहशतवादी संघटनेबरोबरील संबंध तोडलेले नाहीत, असा दावा संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात करण्यात आला होता. त्याचवेळी अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत करणाऱ्या तालिबानने महिलांचे शिक्षण व अल्पसंख्यांकांचे अधिकार यासारख्या मुलभूत गोष्टींवर अजूनही आपली भूमिका सुस्पष्ट केलेली नाही. तसेच दहशतवादाच्या मुद्यावरही आंतरराष्ट्रीय समुदाय तालिबानकडे अजूनही संशयाने पाहत आहे. या पार्श्वभूमीवर, तालिबानचा प्रमुख अखुंदझादा याने दहशतवादासंदर्भातील आंतरराष्ट्रीय समुदायासह अफगाणिस्तानच्या शेजारी देशांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.

not-allow-Afghanistanकाही झाले तरी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दुसऱ्या देशावर हल्ले चढविण्यासाठी होऊ देणार नाही, असे अखुंदझादा याने स्पष्ट केले. याबरोबरच सर्वच शेजारी देशांसह आंतरराष्ट्रीय समुदायाशी सलोखा व सहकार्य प्रस्थापितकरण्यासाठी आपली राजवट उत्सूक असल्याचा संदेश अखुंदझादा याने दिला. मात्र अफगाणिस्तानात दुसऱ्या देशाचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही, हा अखुंदझादा याने दिलेला इशारा पाकिस्तानसाठी असल्याचे संकेत मिळत आहेत. तालिबानचा वापर करून अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळविण्याचे स्वप्ने पाकिस्तानने अजूनही सोडून दिलेली नाहीत. त्यासाठी तालिबानमधील हक्कानी नेटवर्कच्या गटचा वापर पाकिस्तानकडून केला जात आहे. यामुळे तालिबानमधील इतर गट नाराज असल्याचे संकेत मिळत आहेत.

तालिबानच्या राजवटीला अफगाणिस्तानचा कारभार चालविण्यासाठी निधीची आवश्यकता असून अन्नधान्य, औषधांची टंचाई तसेच इतर समस्या सोडविण्यासाटी आंतरराष्ट्रीय सहाय्याखेरीज पर्याय नाही, याचीही जाणीव तालिबानला झालेली आहे. अफगाणी जनतेला अन्नधान्याची टंचाई भेडसावत असताना, भारताने तब्बल 50 हजार मेट्रिक टन इतका गहू अफगाणिस्तानला पाठविण्याचे जाहीर केले. यापैकी काही साठा आधीच भारतातून अफगाणिस्तानला रवाना झाला आहे. तसेच भारताने अफगाणी जनतेसाठी औषधे व लसींचाही पुरवठा केला होता. याची दखल घेऊन तालिबानने भारताची प्रशंसा केली होती.

यामुळे अखुंदझादा याने अफगाणिस्तानच्या भूमीचा इतर देशांविरोधात वापर न करण्याची दिलेली ग्वाही, प्रामुख्याने भारताला उद्देशून असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी त्याने अफगाणिस्तानातील हस्तक्षेपाबाबत दिलेला इशारा पाकिस्तानला नजरेसमोर ठेवून दिला आहे. तालिबानचे धोरण बदलत असल्याचे संकेत यातून मिळत आहेत.

leave a reply