इराणच्या चलनाची जबरदस्त घसरण

- अमेरिकी डॉलरमागे सहा लाख रियालहून अधिक घसरणीची नोंद

इराणच्या चलनाची

दुबई – इराणचे चलन रियालने घसरणीचा नवा विक्रम नोंदविला आहे. एका डॉलरसाठी तब्बल सहा लाख इराणी रियाल मोजावे लागत असून या घसरणीचे इराणमध्ये पडसाद उमटत आहेत. शुक्रवारी डॉलरमागे इराणच्या रियालचे मुल्य 5 लाख, 40 हजार इतके होते. शनिवारी याची अधिकच घसरण झाली आणि इराणच्या रियालचे मुल्य 5 लाख, 75 हजारांपर्यंत घसरले होते. तर रविवारी ही घसरण सहा लाखाच्याही पुढे गेली. इराणच्या राजवटीविरोधात सुरू झालेल्या निदर्शनांमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेवर ही वेळ ओढावल्याचे दावे केले जातात. मात्र इराणच्या यंत्रणा रियालच्या या घसरणीमागे शत्रूदेशांचे कारस्थान असल्याचे आरोप करीत आहेत.

जानेवारी महिन्यात इराणमधील महागाईचा दर तब्बल 53 टक्क्यांच्याही पुढे गेला आहे. याचे भीषण परिणाम इराणची जनता सहन करीत आहे. अशा परिस्थितीत इराणचे चलन अधिकाधिक घसरत असून यामुळे भडकलेल्या महागाईने जनतेच्या संतापाचा उद्रेक झाल्याचे पहायला मिळत आहे. विशेषतः गेल्या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात सुरू झालेल्या हिजाबसक्तीच्या विरोधातील आंदोलनानंतर इराणच्या अर्थव्यवस्थेची अधिकच घसरण झाली आणि पुढच्या काळात या आंदोलनाचे राजवटीविरोधातील चळवळीत रुपांतर झाल्याचे दिसत आहे. सुरूवातीच्या काळात हिजाबसक्तीच्या विरोधात खड्या ठाकलेल्या विद्यार्थिनी व महिलांबरोबरच कामगार आणि व्यापारी वर्ग देखील सहभागी झाला होता.

कठोरपणे हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करूनही इराणच्या राजवटीला या आघाडीवर संपूर्णपणे यश आलेले नाही. अजूनही इराणच्या काही शहरांमध्ये संतप्त निदर्शक राजवटीच्या विरोधात घोषणा देऊन मोर्चे काढत असल्याचे समोर येते. याचा फटका इराणमधील व्यापार व उद्योगाला बसत असून यामुळे इराणी राजवटीच्या विरोधातील संताप अधिकच वाढत चालल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत आपल्या चलनाची घसरण रोखण्यात इराणच्या राजवटीला आलेले अपयश या देशासमोर नवी आव्हाने उभी करणारे ठरेल.

2015 साली पाश्चिमात्य देशांबरोबर अणुकरार करण्यात इराणला यश मिळाले होते. पण पुढच्या काळात अमेरिकेने या करारातून माघार घेतली. त्यानंतर इराणच्या अर्थव्यवस्थेची घसरण सुरू झाली. ज्यो बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर त्यांनी नव्याने या अणुकरारासाठी प्रयत्न केले होते. पण इराणने स्वीकारलेल्या ताठर भूमिकेमुळे हा करार होऊ शकला नाही. आधीच्या काळात इराणची बाजू घेणारे ब्रिटन, फ्रान्स व जर्मनी देखील आता इराणच्या अणुकार्यक्रमावर चिंता व्यक्त करू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय संस्थांनी इराणच्या अणुप्रकल्पातील युरेनियमचे संवर्धन अणुबॉम्बच्या निर्मितीपर्यंत पोहोचत असल्याचे धोकादायक इशारे दिले आहेत. त्याची गंभीर दखल घेऊन इस्रायल कुठल्याही क्षणी इराणवर हल्ला चढवू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झालेली आह. तसेच इराणच्या अणुकार्यक्रमाकडे धोका म्हणून पाहणारे सौदी व इतर आखाती देश आपण इस्रायलच्या बाजूने उभे राहणार असल्याचे संकेत देत आहेत.

यामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेची अधिकच दैना उडली असून इराणची राजवट आपल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष पुरविण्याच्या ऐवजी अमेरिका व इस्रायलच्या विरोधात युद्धाची तयारी करीत आहे. त्यामुळे नजिकच्या काळात इराणच्या अर्थव्यवस्थेसमोरील संकटांचे निवारण होण्याऐवजी या संकटांची तीव्रता अधिकाधिक प्रमाणात वाढत जाणार असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. इराणी शहरांच्या रस्त्यावर उतरून निदर्शक आम्हाला युद्ध व उन्माद नको, तर स्थैर्य आणि रोजगार हवा असल्याच्या घोषणा देत आहेत. इराणच्या माजी नेत्यांनी देखील जनतेची ही मागणी वैध असल्याचे सांगून त्याला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

अशा परिस्थितीत इराणच्या रियालची घसरण या देशाच्या राजवटीसमोरील चिंता अधिकच वाढवित असून याचे आर्थिक, सामाजिक व राजकीय परिणाम इराणमध्ये लवकरच पहायला मिळतील, असे दावे केले जातात. मात्र इराणची राजवट हे सारे शत्रूदेशांनीच घडवून आणल्याच्या आरोपांवर ठाम आहे. या आरोपांद्वारे पुढच्या काळातही आपली धोरणे बदलणार नसल्याचा संदेश इराणच्या राजवटीने आपल्या जनतेला दिल्याचे दिसते.

English हिंदी

leave a reply