चीनच्या वुहानमधील ‘लॅब लिक’मुळेच कोरोनाच्या विषाणूचा फैलाव झाला

अमेरिकन ऊर्जा विभागाचा अहवाल

वॉशिंग्टन – गेल्या तीन वर्षांपासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या व्हायरसने 68 लाखांहून अधिक जणांचा बळी घेतला. जंगली प्राण्यांमधून या विषाणूचा फैलाव झाल्याचे दावे याआधी करण्यात आले होते. पण अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने ही ‘थिअरी’ उधळून लावली. या विषाणूची निर्मिती व फैलाव जैवप्रयोगशाळेतूनच झाल्याचा निष्कर्ष अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने आपल्या नव्या अहवालात नोंदविला आहे. थेट उल्लेख केला नसला तरी या साथीच्या फैलावाला चीनच्या वुहान प्रयोगशाळा जबाबदार असण्याची शक्यता यात वर्तविली आहे. बायडेन प्रशासनातील एक विभाग कोरोनाच्या फैलावासाठी ‘लॅब लिक’ला जबाबदार धरत असताना, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी सदर अहवालापासून फारकत घेतल्याचे दिसते.

CHINA-HEALTH-VIRUSकोरोनाच्या स्त्रोताबाबत अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने तयार केलेला अहवाल व्हाईट हाऊस आणि अमेरिकन काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांकडे सोपविला आहे. या अहवालात अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने कोरोनाच्या उगमाबाबत आपणच केलेला दावा खोडून काढला. तर 2021 साली अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी कोरोनाबाबत तयार केलेल्या अहवालाला अमेरिकन ऊर्जा विभागाच्या या नव्या अहवालाने दुजोरा दिला. सदर विषाणूचा फैलाव चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच झाला होता, असा दावा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने दोन वर्षांपूर्वी केला होता. ऊर्जा विभागाने देखील लॅब लिकमुळेच विषाणूचा फैलाव झाल्याचे ठासून सांगितल्याची बातमी अमेरिकेच्या ‘वॉल स्ट्रिट जर्नल’ने दिली.

अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने आपल्या अहवालात काही पुरावे दिल्याचा दावा केला जातो. जगभरातील अमेरिकेच्या अण्वस्त्रांच्या देखभालीची व्यवस्था या ऊर्जा विभागाकडे आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील प्रयोगशाळा आणि वैज्ञानिक संशोधनाचे मोठे नेटवर्क ऊर्जा विभागाकडून हाताळले जाते. त्यामुळे कोरोनाच्या स्त्रोताबाबत या विभागाने तयार केलेल्या अहवालाचे गांभीर्य अधिक असल्याचा दावा अमेरिकन माध्यमे करू लागली आहेत. अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने उघडउघड कोरोनाच्या उगमासाठी चीनवर आरोप करणे टाळले आहे. पण तशी शक्यता नाकारता येत नसल्याचे या ऊर्जा विभागाने स्पष्ट केले.

मात्र अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी हा अहवालाबाबत स्पष्ट भूमिका घेण्याचे टाळले. कोरोनाच्या स्त्रोताबाबत वेगवेगळ्या गुप्तचर यंत्रणांमध्ये मतमतांतर असल्याचे सुलिवन म्हणाले. तसेच हा अहवाल कोरोनाच्या उगमासाठी थेट चीनला जबाबदार धरत नसल्याचा दावा सुलिवन यांनी केला. ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी कोरोनाच्या स्त्रोताची माहिती काढण्यासाठी व्यापक चौकशीचे आदेश दिले होते. यासाठी खोलवर संशोधन करण्याची सूचना केली होती. पण अमेरिकेच्या तपास यंत्रणांमध्येच याबाबत एकमत झालेले नाही’, असे सांगून सुलिवन यांनी चीनवरील आरोपांची धार बोथट केली.

दरम्यान, याआधीही अमेरिकन यंत्रणांनी चीनच्या वुहान प्रयोगशाळेतून कोरोना फैलावल्याचा आरोप केला होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाव्हायरसचा उल्लेख ‘वुहान व्हायरस’, ‘चायना व्हायरस’ असा केला होता. तर ऑस्ट्रेलियाने देखील चीनच्या वुहान प्रयोगशाळेवर यासाठी आरोप केले होते. चीनने या विषाणूच्या फैलावाबाबत जगाला अंधारात ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

leave a reply