इराणचे ड्रोन्स, क्षेपणास्त्रांपासून अमेरिका व आखाती मित्रदेशांना धोका

- अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाचा इशारा

वॉशिंग्टन/रियाध – इराणनिर्मित ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रे अमेरिका व आखातातील अमेरिकेच्या मित्रदेशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत आहेत. आखातातील हिजबहुल्लाह, हौथी तसेच इराकमधील इतर दहशतवादी संघटनांना इराणच्या ड्रोन्स व क्षेपणास्त्रांचा होत असलेला पुरवठा सर्वात चिंतेचा विषय ठरतो, असे अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने आपल्या अहवालात म्हटले आहे. इराणच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे विशेषदूत सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असताना पेंटॅगॉनने सदर अहवाल प्रसिद्ध करुन इराणला इशारा दिला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इराणबरोबरच्या अणुकरारासाठी नियुक्त केलेले विशेषदूत रॉबर्ट मॉली हे सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये दाखल झाले आहेत. अमेरिका आणि सौदी पुरस्कृत ‘गल्फ कोऑपरेशन काऊन्सिल-जीसीसी’ यांच्यात होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीसाठी मॉली अमेरिकन शिष्टमंडळासह सहभागी झाले आहेत. यामध्ये सौदीसह जीसीसीचे सदस्य असलेले युएई, कतार, बाहरिन, कुवैत आणि ओमानच्या प्रतिनिधींचाही समावेश आहे. या बैठकीत इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने दिलेला अहवाल व क्षेत्रीय तणावावर चर्चा सुरू असल्याचा दावा केला जातो.

या बैठकीचे तपशील समोर येण्याआधी पेंटॅगॉनने इराणपासून वाढत असलेल्या धोक्यावर चिंता व्यक्त केली. अमेरिका व आखातातील मित्रदेशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक असणाऱ्यांमध्ये इराण सर्वात आघाडीवर असल्याचे या अहवालात म्हटले आहे. इराणनिर्मित ड्रोन्स व क्षेपणास्त्रे आखाती देश तसेच या क्षेत्रातील अमेरिकेच्या हितसंबंधांसाठी धोकादायक ठरतात, असे सदर अहवालात नमूद करण्यात आले आहे. हिजबुल्लाह, हौथी आणि इराकमधील दहशतवादी संघटनांना ड्रोन्सचा साठा पुरवून इराणने आखाती जनतेची सुरक्षा धोक्यात टाकल्याचा आरोप या अहवालात करण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात इस्फाहन येथील क्षेपणास्त्रनिर्मितीच्या कारखान्यावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचा सूड घेण्यासाठी इराण या दहशतवादी संघटनांचा वापर करू शकतो, असा इशारा अमेरिकेच्या उपमंत्री डॅना स्ट्रोल यांनी दिला. अशा परिस्थितीत अमेरिका व जीसीसीच्या सदस्य देशांनी इराणविरोधात एकजूट करण्याची आवश्यकता असल्याचा संदेश घेऊन रॉबर्ट मॉली सौदी व इतर अरब देशांच्या नेत्यांची भेट घेत आहेत. इराणबरोबरचा अणुकरार पुनर्जिवित करण्यासाठीचे प्रयत्न बंद पडल्याची घोषणा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती.

leave a reply