एअर इंडिया-बोईंग करारामुळे अमेरिकेत दहा लाख जणांना रोजगार मिळेल

- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन

नवी दिल्ली – एअर इंडिया अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून खरेदी करीत असलेल्या २००हून अधिक प्रवासी विमानांमुळे, अमेरिकेच्या ४४ प्रांतांमधील दहा लाख जणांना रोजगार मिळणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनीच ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. एअर इंडिया व बोईंगमधील सुमारे ३४ अब्ज डॉलर्सच्या या कराराची घोषणा झाल्यानंतर, पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरील चर्चेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हा दावा केला. एअर इंडिया व बोईंगमधील हा करार भारत व अमेरिकेचे सहकार्य अधिकच दृढ करणारा ठरेल, असा विश्वासही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी व्यक्त केला.

प्रवासी विमानांची निर्मिती करणाऱ्या युरोपातील एअरबस कंपनीकडून एअर इंडियाने २५० प्रवासी विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी पंतप्रधान मोदी व फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या व्हच्युर्अल उपस्थितीत याबाबतचा करार संपन्न झाला. याला काही तास उलटत नाहीत तोच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी एअर इंडिया अमेरिकेच्या बोईंगकडून २२० प्रवासी विमाने खरेदी करणार असल्याचे जाहीर केले. यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या करारामुळे अमेरिकेच्या ४४ प्रांतांमध्ये १० लाख जणांना रोजगार मिळेल, असा विश्वास यावेळी बायडेन यांनी व्यक्त केला.

भारताच्या एका कंपनीबरोबर अमेरिकन कंपनीच्या व्यवहारामुळे अमेरिकेतील रोजगाराच्या संधी प्रचंड प्रमाणात वाढतील, याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेली ही कबुली व त्यावर व्यक्त केलेले समाधान अतिशय महत्त्वाची बाब ठरते. बायडेन यांच्या कार्यकाळात अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा निकाल लागला असून कित्येक जणांच्या रोजगारावर गदा आल्याची जोरदार टीका होत आहे. यामुळे २०२४ सालच्या निवडणुकीत बायडेन यांच्या उमेदवारीचा विचारही करता येणार नाही, असे त्यांच्याच पक्षाचे नेते सांगत आहेत. अशा परिस्थितीत एअर इंडियाबरोबरील करारामुळे अमेरिकेत दहा लाख जणांना रोजगार मिळेल, ही बाब राष्ट्राध्यक्ष बायडेन अधिक जोमाने माध्यमांसमोर मांडत आहेत.

व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरन जीन-पेरी यांनी ही सारी माहिती माध्यमांना दिली. तसेच तंत्रज्ञानाच्या आघाडीवरील भारत व अमेरिकेच्या धोरणात्मक भागीदारीचे महत्त्व राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरील चर्चेत अधोरेखित केल्याचा दावा जीन-पेरी यांनी केला. तसेच दोन्ही नेत्यांनी या चर्चेत क्वाड संघटन अधिक भक्कम करण्याचा निर्धार केल्याचे कॅरन जीन-पेरी यांनी म्हटले आहे.

leave a reply