इराकमधील इराणसंलग्न गटाने तुर्कीच्या तळावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली

बगदाद – इराण आणि तुर्कीतील राजकीय तणावात गुरुवारी नवी भर पडली. इराकमधील तुर्कीच्या लष्करी तळावर झालेल्या रॉकेट हल्ल्यांसाठी तुर्कीने कुर्द गटांना जबाबदार धरले होते. पण इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी गटाने तुर्कीच्या तळावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तुर्कीच्या लष्कराची इराकमधील तैनाती बेकायदेशीर असल्याचा आरोप या गटाने केला. बुधवारी सकाळी इराकच्या निनेवे प्रांतातील झिल्कान लष्करी तळावर आठ रॉकेट्सचे हल्ले झाले. यापैकी दोन रॉकेट सदर तळावर कोसळल्याची माहिती तुर्कीच्या लष्कराने दिली. तुर्कीने इराकच्या सीमाभागात तसेच निनेवेसारख्या कुर्दवंशियांची बहुसंख्या असलेल्या भागातील लष्करी तळ ताब्यात घेतले आहेत.

तुर्कीच्या लष्कराची ही अवैध घुसखोरी असल्याचे आरोप इराकचे सरकार सातत्याने करीत आहे. याकडे दुर्लक्ष करून तुर्की इराकमधील कुर्दांच्या ठिकाणांवर हवाई हल्ले चढवित आहे. त्याचा सूड घेण्यासाठी कुर्दांनीच झिल्कान लष्करी तळावर रॉकेट हल्ले चढविल्याचा दावा तुर्कीने केला होता.

पण इराकमधील ‘इस्लामिक रेझिस्टन्स अहरार अल-इराक ब्रिगेड’ या इराणसमर्थक दहशतवादी गटाने झिल्कान लष्करी तळावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. तुर्कीचे लष्कर तैनात असलेल्या या तळावर आठ नाही तर २० रॉकेट्सचे हल्ले चढविल्याचे या गटाने म्हटले आहे.
इराकमधील तुर्कीश लष्कराच्या अवैध तैनातीचा निषेध करण्यासाठी हे हल्ले केल्याचे या इराणसंलग्न गटाने जाहीर केले. त्याचबरोबर लवकरच तुर्कीमध्ये घुसून हल्ले चढविणार असल्याचा इशारा अहरार अल-इराक ब्रिगेडने दिला आहे.

leave a reply