हौथींसाठी शस्त्रे घेऊन जाणारे इराणचे जहाज फ्रान्सच्या ताब्यात

दुबई – रायफल्स, मशिनगन्स आणि रणगाडाभेदी क्षेपणास्त्रांचा मोठा साठा घेऊन येमेनसाठी निघालेले जहाज फ्रान्सच्या नौदलाने ताब्यात घेतले. ओमानच्या आखातात कारवाईदरम्यान पकडलेले सदर जहाज इराणचे असल्याची माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिली. येमेनमधील हौथी बंडखोरांसाठी इराणचे हे जहाज शस्त्रे घेऊन निघाले होते, असा आरोप फ्रान्स व अमेरिकेने केला आहे. पर्शियन आखात ते एडनच्या आखातातून प्रवास करणाऱ्या व्यापारी व इंधनवाहू जहाजांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या फ्रान्सच्या नौदलाने गेल्या महिन्यात इराणच्या जहाजावर ही कारवाई केली. अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्राने याची माहिती उघड केली.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सदर जहाजातून जप्त केलेल्या शस्त्रास्त्रांचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले आहेत. येमेनमधील हौथी बंडखोरांना शस्त्रास्त्रे पुरवून इराणने संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्बंधांचे उल्लंघन केले, असा ठपका अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने केला आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता असलेल्या येमेनच्या सरकारविरोधात बंड पुकारणाऱ्या हौथी बंडखोरांवर संयुक्त राष्ट्रसंघाने निर्बंध लादले आहेत. तरीही इराण राष्ट्रसंघाच्या नियमांचे उल्लंघन करून हौथींना शस्त्रास्त्रे पुरवित असल्याचा आरोप अमेरिका, युरोपिय देश तसेच आखातातील सौदी, युएई व इतर देश करीत आहेत. यामुळे येमेनसह आखाताची सुरक्षा धोक्यात आल्याचा दावा या देशांनी केला आहे.

leave a reply