इराक-इराणमध्ये विशेष सीमासुरक्षा सहकार्य करार

बगदाद – इराक व इराणच्या सीमेवरील सुरक्षा मजबूत करण्यासाठी उभय देशांमधील विशेष सहकार्य करार पार पडला आहे. यानुसार इराकमधील कुर्दांची इराणच्या सीमेतील घुसखोरी रोखण्यावर करार पार पडल्याचा दावा केला जातो. यामुळे इराणवरील कुर्दांचे हल्ले रोखण्यात सहाय्य होईल, असा विश्वास इराण व्यक्त करीत आहे.

इराक-इराणमध्ये विशेष सीमासुरक्षा सहकार्य करारइराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली शामखानी यांनी रविवारी इराकचा दौरा करून पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांची भेट घेतली. काही आठवड्यांपूर्वी इराकमधील कुर्दिस्तान प्रांतातून इराणमध्ये झालेले रॉकेट हल्ले आणि सशस्त्र कुर्द बंडखोरांच्या घुसखोरीविरोधात शामखानी यांनी इराकच्या पंतप्रधानांशी चर्चा केली. तसेच या हल्ल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सीमा सुरक्षा करारासाठी पुढाकार घेतला. यानंतर दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये हा करार पार पडला. यानुसार इराकमधील कुर्दिस्तान प्रांतातून इराणवर कुठल्याही प्रकारचे हल्ले चढविले जाणार नाहीत, असे इराकने मान्य केले आहे.

त्यामुळे येत्या काळात इराणच्या सीमेवर हल्ला झालाच तर इराकच्या कुर्दिस्तान प्रांतात हल्ले चढविण्याचा इराणला अधिकार असेल, असा दावा आखाती माध्यमे करीत आहेत. दरम्यान, कुर्दिस्तान हा इराकमधील स्वायत्त प्रांत असून इंधनसमृद्ध कुर्दिस्तानवर इराकची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. इराकसह इराण, तुर्की व सिरियाला जोडणाऱ्या स्वतंत्र कुर्दिस्तान देशाची कुर्द मागणी करीत आहेत. मात्र इराणने कुर्दांना दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.

हिंदी English

 

leave a reply