नेपाळच्या सीमेतून भारतात दहशतवादी घुसविण्याचा ‘आयएसआय’चा कट

नवी दिल्ली/पाटणा – भारतात नेपाळच्या मार्गाने दहशतवादी घुसविण्याचा कट पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ने आखला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलांकडून दहशतवाद्यांना मोठया प्रमाणावर ठार करण्यात आले आहे आणि येथील सीमेवरून दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे पाकिस्तानचे सारे मनसुबे भारतीय लष्कर उधळून लावत आहे. यामुळे नेपाळ सीमेचा वापर भारतात दहशतवाद्यांना घुसविण्यासाठी आणि करण्याचे अतिमहत्वाच्या व्यक्तींना लक्ष करण्याचे कारस्थान ‘आयएसआय’ने आखले आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांना याबाबत माहिती मिळाल्यावर बिहारसह दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

India-Nepal-ISIपाकिस्तनाच्या ‘आयएसआय’कडून भारताविरोधात नेपाळच्या भूमीचा याधीही वारंवार वापर झाला होता. सध्या भारत आणि नेपाळमध्ये सीमावादामुळे तणाव आहे. तसेच लडाखमध्ये चीन आणि भारतीय लष्कर एकमेकांसमोर खडे ठाकले आहे. याचा लाभ उचलून नेपाळ मार्गाने दहशतवादी घुसविण्याचा आणि भारतात घातपात माजविण्याचा कट ‘आयएसआय’ने आखला आहे. ‘आयएसआय’चे पाठबळ असलेल्या दहशतवादी संघटनांचा भारत-नेपाळ सीमेवर वावर वाढला, असल्याचे सुरक्षा यंत्रणांच्या लक्षात आल्याची बातमी आहे. त्यामध्ये ‘आयएसआय’ने पाच ते सहा दहशतवाद्यांना भारतात घुसखोरीसाठी नेपाळमध्ये पाठविल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.

या पार्श्वभूमीवर बिहारच्या सर्व जिल्ह्यांमध्ये अलर्ट देण्यात आला आहे. जिल्हाच्या सर्व अधिक्षकांना यासंदर्भांत एका पत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे. या पत्रातून हा खुलासा झाला आहे. ‘जैश-ए-मोहमद’चे दहशतवादी बिहारमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. भारतात अतिमहत्वाच्या व्यक्तींना लक्ष्य करण्याचे कारस्थान आयएसआय’कडून आखण्यात आले आहे. तसेच सॉफ्ट टार्गेट म्हणून बिहारमध्येही दहशतवादी हल्ला केला जाऊ शकतो, असा इशारा यंत्रणांनी दिल्याची माहिती उघड होत आहे.

दरम्यान, भारत आणि नेपाळच्या सीमा खुल्या असून या सिममधून दोन्ही देशांचे नागरिक सहज ये-जा करू शकतात. या स्थितीचा ‘आयएसआय’ने या आधीही फायदा घेतला होता. नेपाळमधील पाकिस्तानी दूतावासातून भारतविरोधी कारवाया होत असल्याचे याधीही उघड झाले होते. त्यातच सध्या नेपाळच्या चीनधार्जिण्या सरकारची धोरणे भारतविरोधी असल्याने आता या आघाडीवरही भारताला अधिक सावध राहावे लागेल असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply