चीनबरोबर सीमावाद चिघळलेला असताना, मित्रदेशांचा भारताला शस्त्रास्त्रांचा पुरवठा

नवी दिल्ली – भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांचे लष्कर एकमेकांसमोर खड़े ठाकलेले असताना, सहकारी देशांनी भारताला आवश्यक संरक्षण साहित्याचा पुरवठा करण्याची तयारी दाखविली आहे. यामध्ये अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि इस्रायल या देशांकडून भारताला मिळत असलेले हे सहाय्य चीनची असुरक्षितता अधिकच वाढवित आहे.

India-alliesफ्रान्सबरोबर झालेल्या रफायल लढाऊ विमानांच्या करारानुसार, पुढच्या महिन्याच्या अखेरीस चार रफायल विमाने भारतामध्ये दाखल होणार होती. हवेतून हवेत मारा करणार्‍या लांब पल्ल्याच्या प्रगत क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली चार रफायल विमाने भारताच्या अंबाला विमानतळावर दाखल होणार होती. पण काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेला तणाव पाहता, फ्रान्सने भारताला आणखीन काही युद्धसज्ज रफायल विमानांचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. यानुसार, फ्रान्स भारताला आणखी चार लढाऊ विमाने पुरविणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.

इस्रायलने देखील भारताला हवाई सुरक्षा यंत्रणा पुरवण्याचे संकेत दिले आहेत. इस्रायली लष्कराच्या सेवेत असलेली हवाई सुरक्षा यंत्रणा थेट लडाखमध्ये उतरवण्यात येईल, असा दावा केला जातो. अधिकृत पातळीवर याबाबतची कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही तरी, इस्रायल भारताला हे सहकार्य करण्यास तयार असल्याचे दावे केले जातात. दोन्ही देशांचे सुरक्षाविषयक हितसंबंध एकसमान असल्याने इस्रायल भारताला आवश्यक असलेले संरक्षण साहित्य पुरविण्यासाठी उत्सुक असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. काही पाकिस्तानी पत्रकारांनी तर चीनच्या विरोधात इस्रायलने भारताला याआधीच सहाय्य पुरविण्याची सुरुवात केल्याचा दावा केला आहे.

तर पारंपरिक सहकारी मित्रदेश असलेल्या रशियाने भारताला पुढच्या काही आठवड्यांमध्ये अब्जावधी डॉलर्सची शस्त्रास्त्रे पुरवण्याचे मान्य केले आहे. यामध्ये क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रास्त्रांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या आठवड्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या रशिया दौऱ्यात याबाबतची चर्चा पार पडली. तर अमेरिकेने भारतीय लष्कराला आवश्यक साहित्यांसह एक्सकॅलिबर तोफगोळे पुरविल्याची माहिती समोर येत आहे.

India-alliesअमेरिका, रशिया, फ्रन्स आणि इस्रायल यासारख्या प्रबळ देशांकडून भारताला पुरविण्यात येत असलेली शस्त्रास्त्रे व संरक्षण साहित्य चीनच्या चिंतेचा विषय बनला आहे. यामुळे चीनची असुरक्षितता अधिकच वाढल्याचे संकेत मिळत आहेत. म्हणूनच चीनची सरकारी माध्यमे भारताला पाश्चिमात्यांच्या नादी लागून चीनशी वैर पत्करु नका, असे धमकावत आहेत. त्याचवेळी, पाकिस्तान व नेपाळचा वापर करुन चीन भारताला जेरीस आणू शकतो, असे इशारे चीनची सरकारी माध्यमे देत आहेत. स्वतःला जागतिक महासत्ता मानणाऱ्या चीनवर पाकिस्तान व नेपाळ सारख्या देशांवर विसंबून राहण्याची वेळ ओढावली हीच बाब चीनला वाटत असलेली असुरक्षितता स्पष्ट करण्यासाठी पुरेशी ठरते.

आंतरराष्ट्रीय समुदाय भारताच्या बाजूने ठामपणे उभा राहिलेला असताना, चीनने तुर्कीला भारतविरोधी आघाडीत सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी चीनने तुर्कीला शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे सदस्यत्व देण्याचे आमिष दाखविले होते. पण, तुर्कीने भारतविरोधी भूमिका स्विकारण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे.

leave a reply