सुरक्षा परिषदेच्या अकार्यक्षमतेमुळे युक्रेनचे युद्ध भडकले

- संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या अध्यक्षांचा ठपका

युक्रेनचे युद्धनवी दिल्ली – भारताच्या भेटीवर असलेले संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेचे अध्यक्ष साबा कोरोसी यांनी पंतप्रधान मोदी व परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या सुधारणेचा मुद्दा परराष्ट्रमंत्री जयशंकर व कोरोसी यांच्या चर्चेत असल्याचे सांगितले जाते. सुरक्षा परिषदेचा विस्तार करणे आवश्यक असल्याची बाब यावेळी कोरोसी यांनी मान्य केली असून सुरक्षा परिषदेच्या अकार्यक्षमतेमुळेच युक्रेनचे युद्ध पेटले, असा दावा कोरोसी यांनी केला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेचे अध्यक्ष म्हणून कोरोसी पहिल्यांदाच भारतभेटीवर आले आहेत. आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी त्यांनी भारताची निवड केली, ही लक्षणीय बाब ठरते, असे दावे केले जातात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या विस्ताराबाबत कोरोसी यांनी लक्षवेधी विधाने केली आहेत. जगातील सत्तेचा तोल बदलू लागला असून त्याचे प्रतिबिंब संयुक्त राष्ट्रसंघाच्या कारभआरात पडलेले नाही, अशी खंत कोरोसी यांनी व्यक्त केली आहे. जगभरातील देश आणि प्रमुख नेते सुरक्षा परिषदेत बदलाची मागणी करून याच्या विस्ताराचा मुद्दा उपस्थित करीत आहेत, याकडे कोरोसी यांनी लक्ष वेधले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य असलेल्या देशांकडे प्रचंड प्रमाणात पॉवर एकवटलेली आहे. ते याचा दुरूपयोग करीत असून काही स्थायी सदस्यदेश इतर देशांवर हल्ले चढवित आहेत, अशी टीका देखील यावेळी कोरोसी यांनी केली. थेट उल्लेख केलेला नसला तरी युक्रेनवर हल्ला चढविणाऱ्या रशियाला कोरोसी लक्ष्य करीत असल्याचे दिसते. युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यापासून सुरक्षा परिषद एकदाही ठोस निर्णय घेऊ शकलेला नाही, या अकार्यक्षमतेवरही कोरोसी यांनी बोट ठेवले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्बंधांची कारवाई केवळ आणि केवळ सुरक्षा परिषदेच्या मार्फतच होऊ शकते, ही बाब देखील कोरोसी यांनी लक्षात आणून दिली. अशा परिस्थितीत सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यांमधले मतभेद अधिकाधिक विसंवाद घडवून आणणून नवी आव्हाने उभी करणारे ठरतात, असा दावा कोरोसी यांनी केला.

यामुळे सुरक्षा परिषदेत विसंवाद होऊन कुठलाही निर्णय घेतला जात नाही, असे सांगून कोरोसी यांनी यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची भेट घेऊन साबा कोरोसी यांनी महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केली. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याबरोबरील चर्चेत भारतात आयोजित केल्या जाणाऱ्या जी२० परिषद तसेच युक्रेनच्या युद्धाचा मुद्दा ऐरणीवर होता, अशी माहिती दिली जाते.

leave a reply