इराणबाबतच्या अमेरिकेच्या भूमिकेतील बदलावर इस्रायलची चिंता

- अमेरिकी वृत्तसंस्थेचा दावा

वॉशिंग्टन – ‘इराण येत्या काही महिन्यांमध्ये अणुबॉम्बची निर्मिती करू शकतो. पण काही झाले तरी इराणच्या ताफ्यात अणुबॉम्ब येऊ देणार नाही’, अशी घोषणा अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी केली होती. इराणला अणुबॉम्बची निर्मिती करू देणार नसल्याची अमेरिकेची याआधीची भूमिका होती. त्यामुळे जनरल मिले यांच्या या घोषणेवर इस्रायलने प्रश्न उपस्थित केले आहेत. बायडेन प्रशासनाने इस्रायलला विश्वासात न घेता आपल्या इराणबाबतच्या भूमिकेत बदल तर केला नाही ना, अशी चिंता इस्रायलचे अधिकारी व्यक्त करीत आहेत.

इराणबाबतच्या अमेरिकेच्या भूमिकेतील बदलावर इस्रायलची चिंता - अमेरिकी वृत्तसंस्थेचा दावागेल्या महिन्यात अमेरिकन काँग्रेसच्या चौकशी समितीसमोर बायडेन प्रशासनाची बाजू मांडताना संरक्षणदलप्रमुख मार्क मिले यांनी इराणच्या अणुकार्यक्रमापासून अमेरिका व आखातातील हितसंबंधांना धोका असल्याचे म्हटले होते. युरेनियमचे संवर्धन धोकादायक स्तरावर नेणारा इराण दोन आठवड्यात अणुबॉम्बसाठी आवश्यक इंधन मिळवू शकतो, अशी माहिती जनरल मिले यांनी दिली होती. एकदा का, अणुइंधन मिळविल्यानंतर इराण काही महिन्यांमध्ये अणुबॉम्बची निर्मिती करील, असा दावा अमेरिकेच्या संरक्षणदलप्रमुखांनी केला.

पण यानंतरही अमेरिका इराणवर कारवाई करणार नाही. मात्र इराणने सदर अणुबॉम्ब ‘फिल्डेड’ करण्याचा अर्थात क्षेपणास्त्रांवर लादून स्वत:च्या ताफ्यात सामील करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका ते होऊ देणार नसल्याचे जनरल मिले यांनी म्हटले होते. इस्रायलचे पंतप्रधान कार्यालय, संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’शी संबंधित चार अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या इराणबाबतच्या या भूमिकेवर चिंता व्यक्त केली. इराणबाबतच्या अमेरिकेच्या भूमिकेतील बदलावर इस्रायलची चिंता - अमेरिकी वृत्तसंस्थेचा दावा‘फिल्डेड’ हा शब्द वापरुन अमेरिका इराणला अणुबॉम्बच्या निर्मितीची परवानगी देत तर नाही ना, असा सवाल इस्रायली अधिकाऱ्यांनी अमेरिकी वृत्तसंस्था ‘एक्सियॉस’शी बोलताना केला.

तसेच इराण अवघ्या काही महिन्यांमध्ये अणुबॉम्बची निर्मिती करू शकतो, याबाबतची माहिती अमेरिकेने इस्रायलला पुरविली नाही, यावरही सदर अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. इस्रायलच्या माहितीप्रमाणे अणुइंधन मिळविल्यानंतर इराणला अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी एक किंवा दोन वर्षाचा कालावधी लागू शकतो. पण इराणचा अणुकार्यक्रम इतका प्रगत झालेला असतानाही अमेरिकेने याबाबत आपल्याला सावध केले नाही, यावर इस्रायली अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, इस्रायलला विचारात न घेता बायडेन प्रशासनाने इराणबरोबर अंतरिम करार करण्याची तयारी केल्याची बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली होती. यावरुन अमेरिका व इस्रायलमध्ये मतभेद असल्याचा दावा अमेरिकी वृत्तसंस्थेने केला होता.

leave a reply