हमासच्या बलून बॉम्बच्या हल्ल्यांनंतर इस्रायलची गाझात जोरदार कारवाई

जेरुसलेम – इस्रायली लष्कराने गुरुवारी पहाटे गाझापट्टीतील हमासच्या ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ले चढविले. गेल्या दोन दिवसांपासून हमासच्या दहशतवाद्यांकडून इस्रायलमध्ये सुरू असलेल्या बलून बॉम्बच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. तर इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी गाझाला होत असलेला इंधनाचा पुरवठा रोखला आहे. गेल्या कित्येक दिवसात पहिल्यांदाच इस्रायलने गाझापट्टीत एवढी मोठी कारवाई केल्याचा दावा केला जातो.

बलून बॉम्ब

गेल्या काही दिवसांपासून गाझापट्टीतून इस्रायलच्या सीमाभागात बलून बॉम्बचे हल्ले सुरू आहेत. मंगळवारपासून या बलून बॉम्बची तीव्रता वाढली असून गेल्या दोन दिवसात या हल्ल्यांमध्ये इस्रायलच्या सीमाभागात किमान ८० ठिकाणी आगी भडकल्या आहेत. या आगींमुळे इस्रायलच्या होफ अश्केलोन, एश्खोल भागात नुकसान झाल्याची माहिती इस्रायली यंत्रणा देत आहेत. गाझातून होणार्‍या या बलून बॉम्बच्या हल्ल्यांसाठी हमास जबाबदार असल्याचा ठपका ठेवून इस्रायलने बुधवारी मध्यरात्रीनंतर गुरुवार सकाळपर्यंत हमासच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले केले.

बलून बॉम्ब

इस्रायली लढाऊ विमाने, हेलिकाप्टर्स तसेच रणगाड्यांनी गुरुवारी पहाटेपर्यंत गाझातील हमासचे भुयारी नेटवर्क, गस्ती चौक्या, लष्करी तसेच नौदल तळ यांना लक्ष्य केले. गाझाच्या उत्तरेकडील बैत हनून शहरापासून दक्षिणेकडील रफाह या शहरांमधील हमासच्या ठिकाणांवर ही कारवाई केल्याचे गाझातील माध्यमांनी म्हटले आहे. इस्रायलच्या या कारवाईत हमासचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जाते. पण हमासने याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. तर या हवाई कारवाईनंतर इस्रायलने गाझावर निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. इस्रायल व गाझाला जोडणार्‍या ’केरेम शालोम’ हा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर गाझापट्टीची कोंडी करण्यासाठी इस्रायलने इंधनाचा पुरवठा व मासेमारीचे क्षेत्र देखील मर्यादित केले आहे.

बलून बॉम्ब

दरम्यान, इस्रायल आणि अमेरिकेने बुधवारी रात्री ‘ऍरो-२’ क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याची माहिती दोन्ही देशाच्या यंत्रणांनी प्रसिद्ध केली. इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तरित्या विकसित केलेल्या या क्षेपणास्त्राने भूमध्य समुद्रातून प्रक्षेपित केलेले लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र यशस्वीरित्या भेदले. इस्रायल नेहमीच आपल्या शत्रूच्या एक पाऊल पुढे असल्याचे या चाचणीतून उघड झाल्याची घोषणा इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी केली. गांत्झ यांनी थेट उल्लेख केला नसला तरी गाझातील हमास, लेबेनॉनमधील हिजबुल्लाह आणि या दहशतवादी संघटनांना समर्थन देणार्‍या इराणला उद्देशून हा इशारा असल्याचे बोलले जाते.

leave a reply