इस्रायल कोरोनाव्हायरसची ‘अँटीबॉडी’ जगासोबत शेअर करण्यास उत्सुक

नवी दिल्ली – इस्रायलने कोरोनाव्हायरसची ‘अँटीबॉडी’ विकसित केल्याचा दावा केला होता. ही अँटीबॉडी विषाणूवर हल्ला करुन आजारी व्यक्तीच्या शरीरातील विषाणू पूर्णतः निष्प्रभ करुन टाकते. इस्रायलच्या या संशोधनाची जगभरात चर्चा सुरु झाली. अशावेळी इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन माल्का यांनी हे संशोधन आम्ही जगासोबत शेअर करण्यास उत्सुक असल्याचे जाहीर केले. तसेच कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या काळात भारत आणि इस्रायलचे संबंध अधिकच दृढ झाले, असे सांगून रॉन माल्का यांनी त्यावर समाधान व्यक्त केले.

इस्रायलच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्च’ या संरक्षणक्षेत्रातील संस्थेने ही अँटीबॉडी विकसित केली. या संशोधनाविषयी माध्यमांनी रॉन माल्का यांना विचारणा केली. प्रकिया अद्याप पूर्ण झालेली नाही, असे माल्क म्हणाले. ‘आमचे संशोधन अंतिम टप्प्यात आहे. अर्थातच आम्ही हे संशोधन जगासोबत शेअर करु’ असे रॉन माल्का अभिमानाने म्हणाले. यावेळी त्यांनी भारत आणि इस्रायलच्या संबंधाचा दिलेला दाखला सूचक ठरतो.

कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या काळात भारत आणि इस्रायलचे संबंध अधिकच दृढ झाले आहेत. तसेच उभय देशांनी कोरोनाव्हायरसच्या संर्दभात अनुभवाची देवाणघेवाण केल्याची माहिती माल्का यांनी दिली. काही दिवसांपूर्वी भारत आणि इस्रायल आर्टिफिशिल इंटलेजिन्सचा वापर करुन संयुक्तरीत्या कोरोनाव्हायरसची लस विकसित करण्यावर काम करीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

तसेच भारताने इस्रायलला कोरोनाव्हायरसच्या रुग्णांवरील उपचारासाठी प्रभावी ठरणाऱ्या ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’चा पुरवठा केला होता. त्यावेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी भारताचे आभार मानले होते. यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि इस्रायल संयुक्तरीत्या या साथीविरोधात लढा देईल, असा विश्वास व्यक्त केला होता. तसेच भारत त्याच्या मित्रदेशाला सर्वोतोपरी सहाय्य करील, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिले होते.

leave a reply