देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५० हजारांवर

- महाराष्ट्रात चोवीस तासात १२३३ नवे रुग्ण आढळले

नवी दिल्ली – देशातील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या सतत वाढत असून चोवीस तासात देशात १२६ जण या साथीने दगावले. तसेच सुमारे तीन हजार नवे रुग्ण आढळल्याने देशातील या साथीच्या एकूण रुग्णांची संख्या ५० हजारांवर पोहोचली आहे. देशात गेल्या पाच दिवसातच ५२६ जणांचा बळी गेला आहे, तर रुग्णांची संख्या ११ हजारांनी वाढली आहे. महाराष्ट्रात या साथीच्या रुग्णांच्या संख्येने १६ हजारचा टप्पा ओलांडला आहे. बुधवारी एका दिवसातच १२३३ नव्या रुग्णांची नोंद राज्यात करण्यात आली. महाराष्ट्रातील या वाढत्या संक्रमणावर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी चिंता व्यक्त केली आहे.

देशात मंगळवारी सकाळपासून ते बुधवारीच्या सकाळपर्यंत कोरोनाचे २९५८ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने जाहीर केली. यामुळे देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या ४९,३९४ इतकी झाली आहे. यामध्ये बुधवारी दिवसभरात विविध राज्यात नोंद झालेल्या रुग्णांच्या संख्येचा समावेश नसल्याने प्रत्यक्षात एकूण रुग्णांची संख्या ५० हजारांच्याही पुढे गेली आहे. महाराष्ट्रातीलच रुग्ण संख्येने १६ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या १६,७५८ वर पोहोचली आहे. मुंबईतीलच रुग्णांची संख्या १० हजारांच्या पुढे गेली आहे.

बुधवारी महाराष्ट्रात ३४ जण दगावले असून चोवीस तासात तब्बल १२३३ नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईतच ७६९ नव्या रुग्णांची नोंद झाली. याआधी मंगळवारी राज्यात ३४ जण या साथीने दगावले होते. यापैकी २६ जण हे मुंबईतील होते. तसेच राज्यात ८४१ नवे रुग्ण आढळले होते. यातील ६३५ मुंबईतील होते. मुंबईत दाटीवाटीच्या झोपड्यांमध्ये आढळणाऱ्या रुग्णांमुळे चिंता वाढली आहे. धारावीत बुधवारी ६८ नव्या रुग्णांची नोंद झाली. मंगळवारी मुलुंडमधील इंदिरानगर येथील भागात एकाच दिवसात ५५ नवे रुग्ण सापडले होते.

आतापर्यंत महाराष्ट्रातील ३६ पैकी ३४ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संक्रमणावर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी याविषयावर ऑनलाईन चर्चा केली. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि सोलापूरमध्ये रुग्ण संख्या वाढत असून या भागाकडे विशेष लक्ष देण्याची सूचना हर्ष वर्धन यांनी केली.

महाराष्ट्रानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी गुजरातमधील परिस्थितीचाही आढावा घेतला. गुजरातमध्ये रुग्ण दगावण्याचे प्रमाण अधिक असून इथल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र व राज्याने समन्वयाने काम करण्याची आवश्यकता हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे. गुजरातमध्ये बुधवारी २८ जणांचा या साथीमुळे मृत्यू झाला, तर ३८० नवे रुग्ण आढळले. दिल्ली, पंजाब, राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्येही रुग्ण वाढत आहेत. केंद्र शासित प्रदेश असलेल्या दादरा नगरहवेलीमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. केरळात बुधवारी एकाही नव्या रुग्णाची नोंद झाली नाही. दरम्यान तेलंगणा सरकारने लॉकडाऊन २९ मे पर्यंत वाढविला आहे.

leave a reply