इराणी अणुशास्त्रज्ञाच्या हत्येशी इस्रायलचा संबंध नाही – इस्रायलच्या सरकारचा खुलासा

इस्रायलचा संबंध

तेल अविव – इराणचे अणुशास्त्रज्ञ फखरीझादेह यांच्या हत्येशी इस्रायलचा संबंध नसल्याचे इस्रायलच्या वरिष्ठ मंत्र्यांनी म्हटले आहे. मात्र इस्रायली माध्यमांनी याबाबत अतिशय वेगळे दावे केले आहेत. इराणला अणुबॉम्ब निर्मितीपासून रोखण्यासाठी तसेच इराणचा अणुकार्यक्रम नष्ट करण्यासाठी इस्रायलने योजना आखल्या होत्या. यापैकी अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीझादेह यांची हत्या घडविणे, हे इस्रायलच्या दीर्घकालिन योजनेचे सर्वोच्च शिखर होते, असा दावा ‘चॅनेल 12’ या इस्रायली वृत्तवाहिनीने केला. फखरीझादेह यांच्या हत्येनंतर इराणकडून प्रतिक्रिया अपेक्षित असून इस्रायल यासाठी सज्ज असल्याचा दावाही इस्रायली वृत्तवाहिनीने केला आहे. वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ फखरीझादेह यांच्या हत्येसाठी इराण इस्रायलला दोषी धरत आहे. इस्रायलच्या कंत्राटी सैनिकांनी फखरीझादेह यांची हत्या घडविल्याचा आरोप इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी केला होता. इराण तसेच अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्रांनी इस्रायलनेच ही हत्या घडविल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना केलेल्या विधानांचा वापर केला आहे.

इस्रायलचा संबंध

पण इराणी अणुशास्त्राच्या हत्येशी इस्रायलचा काहीही संबंध नसल्याचे इस्रायलच्या गुप्तचर मंत्रालयाचे प्रमुख एली कोहेन यांनी लष्करी रेडिओवाहिनशी बोलताना स्पष्ट केले. पंतप्रधान नेत्यान्याहू यांचे विधान फखरीझादेह यांच्या हत्येत इस्रायल सहभागी असल्याचे संकेत देणारे नव्हते, असे कोहेन यांनी म्हटले आहे. याउलट अरब देशांबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्याबाबत आपल्या सरकारने मिळविलेले यश, याकडे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी लक्ष वेधल्याची माहिती कोहेन यांनी दिली.

मात्र, फखरीझादेह यांच्या हत्येबाबत इस्रायलला अजिबात दु:ख झालेले नाही, हे ही कोहेन यांनी स्पष्ट केले. अणुबॉम्बची निर्मिती करणारा ठार होणे, आखात तसेच जागतिक सुरक्षेच्या भल्याचेच आहे, अशी टिपणी कोहेन यांनी केली. तर इस्रायली वृत्तवाहिन्या इराणी शास्त्रज्ञाची हत्या हे इस्रायलच्या दीर्घकालिन योजनेचा भाग होता, असा दावा करीत आहेत.

इराणला अणुबॉम्ब निर्मितीपासून रोखण्यासाठी इस्रायलने ज्या काही योजना आखल्या होत्या, त्यामध्ये फखरीझादेह यांचा काटा काढण्याचे ध्येय सदर योजनेच्या सर्वोच्च शिखरावर होते, असा दावा ‘चॅनेल 12’ने केला. तर फखरीझादेह नेहमीच इस्रायलच्या वेगवेगळ्या सरकार तसेच गुप्तचर यंत्रणेच्या नेहमीच निशाण्यावर होते, असे ‘चॅनेल 13’ या वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

leave a reply