नायजेरियात ‘बोको हराम’चे अमानुष हत्याकांड

- 43 जणांची गळे चिरून हत्या

हत्याकांडअबुजा – नायजेरियातील दहशतवादी संघटना ‘बोको हराम’ने बोर्नो प्रांतात भीषण हत्याकांड घडवून 43 शेतकऱ्यांचा बळी घेतला. मैदुगुरी शहराजवळ दहशतवाद्यांनी शेतकऱ्यांना बांधून त्यांचे गळे चिरल्याची भयंकर बाब समोर आली आहे. नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी यावर तीव्र शोक व्यक्त केला असून हे हत्याकांड अमानवी घटना असल्याचे म्हटले आहे. मैदुगुरीतील हे हत्याकांड या वर्षातील सर्वात मोठा व क्रूर दहशतवादी हल्ला असल्याचा दावा स्थानिक यंत्रणांनी केला आहे. शनिवारी ‘बोको हराम’चे दहशतवादी मैदुगुरी शहरानजिक असलेल्या कोशोबे गावात घुसले. गावातील भाताच्या शेतावर झोपलेल्या 60 जणांना दहशतवाद्यांनी ताब्यात घेतले.

त्यातील 50 जणांना बांधून त्यातील 43 जणांची गळे चिरुन हत्या केली. सहा जण गंभीर जखमी असून इतर शेतकरी बेपत्ता असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. हे शेतकरी सोकोता प्रांतातून कंत्राटी शेतीसाठी या भागात आले होते, असे सांगण्यात आले आहे. नायजेरियाची राष्ट्राध्यक्ष मुहम्मदु बुहारी यांनी या हत्याकांडावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘बोर्नो प्रांतातील हत्याकांडाने पूर्ण देश हादरला आहे. दहशतवाद्यांनी कष्ट करणाऱ्या मेहनती शेतकऱ्यांची क्रूरपणे हत्या केली. या अमानुष घटना अत्यंत निंदाजनक आहे’, असे राष्ट्राध्यक्ष बुहारी म्हणाले. गावातील शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी बोको हरामच्या एका दहशतवाद्याला पकडून दिले होते. त्याचा सूड म्हणून हे हत्याकांड घडविण्यात आले असावे, असा दावा स्थानिक गटांनी केला आहे. ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेशी संलग्न असणारी ‘बोको हराम’ ही आफ्रिकेतील सर्वात धोकादायक दहशतवादी संघटना म्हणून ओळखण्यात येते. गेल्या दशकात स्थापन झालेल्या या संघटनेने नायजेरियासह चाड व नायजर या देशांमध्येही आपला विस्तार करण्यात यश मिळविले आहे.

हत्याकांड

या संघटनेने केलेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये आतापर्यंत सुमारे 30 हजार जणांचा बळी गेला असून 20 लाखांहून अधिक नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ ओढवली आहे. गेल्या काही वर्षात नायजेरिया लष्कराने सातत्याने ‘बोको हराम’ विरोधात व्यापक कारवाई करून संघटना संपविल्याचे दावे केले आहेत. नायजेरियाव्यतिरिक्त चाडनेही या संघटनेला खिळखिळी केल्याचे सांगितले होते. मात्र एकापाठोपाठ होणाऱ्या हल्ल्यांनी हे दोन्ही देशांचे दावे फोल ठरल्याचे दिसत आहे. उलट अशा दाव्यांनंतर बोको हराम अधिक मोठे व क्रूर हल्ले चढवून आपली ताकद दाखवून देत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या संरक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात आफ्रिका खंडातील दहशतवाद पुन्हा एकदा वाढत असल्याची जाणीव करून दिली होती. दोन दिवसांपूर्वी सोमालियात ‘अल शबाब’ या दहशतवादी संघटने घडविलेला भीषण स्फोट व ‘बोको हराम’ने केलेले अमानुष हत्याकांड या घटनांमधून त्याला पुष्टी मिळत आहे.

leave a reply