गोलान सीमेजवळ बॉम्ब पेरणाऱ्या सिरियन दहशतवाद्यांना इस्रायलने ठार केले

जेरूसलेम – इस्रायलच्या गोलान सीमेजवळ बॉम्ब पेरणार्‍या चार दहशतवाद्यांना यशस्वीरित्या ठार केल्याची घोषणा इस्रायली लष्कराने केली. त्याचबरोबर सिरियाच्या हद्दीतून इस्रायलवर कुठल्याही प्रकारचे दहशतवादी हल्ले झाले तर यासाठी सिरियातील अस्साद राजवट जबाबदार असेल, असा इशारा इस्रायली लष्कराने दिला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांनी लेबेनानच्या सीमेतून इस्रायलमध्ये घुसखोरी करुन घातपात घडविण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून इस्रायलने सर्व सीमांवरील आपल्या लष्कराला हाय अलर्ट ठेवले आहे.

गोलान

इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, सिरियाला जोडणार्‍या गोलान टेकड्यांच्या सीमेवर बॉम्ब पेरून घातपात घडविण्याची तयारी चार दहशतवाद्यांनी केली होती. या चारही दहशतवाद्यांनी गोलानची सीमारेषा ओलांडली होती. इस्रायली लष्कराच्या ‘मॅग्लॅन’ या स्पेशल फोर्सेसच्या पथकाने या दहशतवाद्यांना हेरुन कारवाई केली. इस्रायली लष्कर व लढाऊ विमानांच्या या कारवाईत दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांची घुसखोरी, बॉम्ब पेरणे आणि त्यांच्यावरील कारवाईचा व्हिडिओ इस्रायली लष्कराने प्रसिद्ध केला. या घटनेनंतर गोलानवरील इस्रायली लष्कर अधिक सतर्क झाले आहे.

हे दहशतवादी कुठल्या संघटनेचे होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण या कारवाईनंतर इस्रायली लष्कराने सिरियातील अस्साद राजवटीला बजावले आहे. सिरियाच्या सीमेतून इस्रायलच्या सुरक्षेला आव्हान दिले गेले तर अस्साद राजवटीला सर्वस्वी जबाबदार धरले जाईल, असा इशारा इस्रायली लष्कराने दिला. रविवारी रात्री गोलान सीमेवरील या अपयशी घातपाती हल्ल्यासाठी हिजबुल्लाह जबाबदार असल्याची दाट शक्यता वर्तविली जाते. गेल्याच आठवड्यात हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ले चढविण्याची धमकी दिली होती.

गेल्या महिन्यात सिरियात झालेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा मोठा कमांडर ठार झाला होता. इस्रायलने हा हवाई हल्ला चढविल्याचा आरोप सिरियन माध्यमांनी केला होता. त्यानंतर हिजबुल्लाहने आपल्या कमांडरच्या हत्येसाठी इस्रायलवर हल्ले चढविण्याची धमकी दिली होती. गेल्या आठवड्यात हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या सीमेवर हल्ले चढविले होते. त्यामुळे गोलानच्या सीमेजवळील घातपाताच्या कटामागे हिजबुल्लाह असण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येते.

leave a reply