अमेरिकेचे इराणवरील निर्बंध चीनलाही लागू पडतील

- परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ

वॉशिंग्टन – ‘चीनने इराणबरोबर ४०० अब्ज डॉलर्सचा व्यापारी करार केला तर, अमेरिकेने इराणवर लादलेले सर्व निर्बंध चीनलाही लागू पडतील. चीनची कम्युनिस्ट पार्टी आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांवरही निर्बंध लादले जातील’, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी दिला. चीन आणि इराणमधील या करारामुळे आखातात अस्थैर्य निर्माण होईल, असा आरोपही पॉम्पिओ यांनी केला.

America-Iran-Chinaगेल्या महिन्यात इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी चीनबरोबरच्या ४०० अब्ज डॉलर्सच्या व्यापारी सहकार्याची घोषणा केली. चीन-इराणमधील सदर सहकार्य २५ वर्षांसाठी असून इराणच्या संसदेत या सहकार्याला मंजूरी मिळताच यासंबंधीचा करार पार पडेल, असे झरिफ म्हणाले होते. चीनबरोबरच्या या सहकार्यामुळे इराणला व्यापारी तसेच लष्करी स्तरावरही मोठा फायदा होईल, असा दावा इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला होता. अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीशी बोलताना परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी चीन-इराणमधील या सहकार्यावर टीका केली.

‘लोकशाही आणि स्वातंत्र्याचा अनादर करणार्‍या तसेच इतर देशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरणार्‍या दोन राजवटींमध्ये अशा प्रकारचे सहकार्य प्रस्थापित होणे, यात आश्चर्य वाटण्यासारखे काहिही नाही’, असे पॉम्पिओ म्हणाले. पण चीन व इराणमधील हा करार अमेरिका खपवून घेणार नसल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले. यासाठी इराणवर लादलेल्या निर्बंधांची आठवण पॉम्पिओ यांनी करुन दिली. संयुक्त राष्ट्रसंघाने इराणवर लादलेले निर्बंध कायम रहावे, यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. पण चीनचा इराणबरोबरील सदर करार या निर्बंधांना आव्हान देणारा असल्याची टीका अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली.

America-Iranत्यामुळे चीनने इराणबरोबर हा ४०० अब्ज डालर्सचा करार केला तर, अमेरिकेने इराणवर लादलेले सर्व निर्बंध चीनवरही लागू केले जातील, असे पॉम्पिओ यांनी बजावले. इराणशी सहकार्य करणार्‍या चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य आणि कंपन्यांना लक्ष्य केले जाईल, याची जाणीव पॉम्पिओ यांनी करुन दिली. त्याचबरोबर चीन आणि इराणमधील या कराराकडे आखाती देशांनी काळजीपूर्वक पहावे. चीनची इराणमधील गुंतवणूक आखातात अस्थैर्य निर्माण करू शकते. इस्रायलची सुरक्षा अधिक धोक्यात टाकू शकते. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांनाही या करारापासून धोका असल्याचे पॉम्पिओ यांनी सांगितले.

‘इराण हा दहशतवादाचा जगातील सर्वात मोठा प्रायोजक देश आहे. चीनबरोबरच्या सहकार्याअंतर्गत इराणला आधुनिक शस्त्रास्त्रे मिळू शकतात. असे झाले तर या क्षेत्राची सुरक्षा अधिक संकटात येईल’, याची जाणीव पॉम्पिओ यांनी करुन दिली. त्यामुळे आखाती देशांनीही चीन-इराणमधील सहकार्याला विरोध करावा, असे आवाहन अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केले. याआधी अमेरिकेतील अभ्यासगटांनी चीन-इराण करारावर चिंता व्यक्त केली होती. या कराराअंतर्गत चीन पर्शियन आखातातील इराणचे बेट ताब्यात घेईल. त्यामुळे पर्शियन आखातासह हिंदी महासागरातील अमेरिकेच्या हितसंबंधांना तसेच सागरी सामर्थ्याला आव्हान मिळेल, असा इशारा या अभ्यासगटांनी दिला होता.

leave a reply