इस्रायलने युरोपिय देशांना हिजबुल्लाहपासून असलेल्या धोक्याची जाणीव करून दिली

तेल अविव – इस्रायलच्या लेबेनॉनजवळील सीमेवर युरोपिय देशांच्या राजदूतांचा दौरा घडवून, हिजबुल्लाहपासून इस्रायलला असलेल्या धोक्याची जाणीव करून दिली. हिजबुल्लाहने पेरलेले सुरूंग तसेच हिजबुल्लाहकडून हस्तगत केलेला शस्त्रसाठा दाखवून इतर संवेदनशील माहितीही यावेळी इस्रायलने युरोपिय देशांच्या राजदूतांसमोर ठेवली.

इस्रायल हिजबुल्लाहवर जबरदस्त कारवाईच्या तयारीत असल्याचे दावे केले जातात. त्याचवेळी हिजबुल्लाह देखील इस्रायलवर हजारो क्षेपणास्त्रे व रॉकेटस्चा वर्षाव करण्याच्या धमक्या देत आहे. या पार्श्‍वभूमीवर, युरोपिय देशांच्या राजदूतांनी आपल्या लेबेनॉनजवळील सीमेवर नेऊन इस्रायलने हिजबुल्लाहपासून असलेला धोक्याची कल्पना युरोपिय देशांना दिली आहे. ही बाब आगामी काळातील इस्रायलच्या आक्रमक धोरणांचे संकेत देत आहे.

इस्रायलचे लष्कर आणि ‘युरोपियन लिडरशीप नेटवर्क’ या लंडनस्थित अभ्यासगटाने इस्रायलमधील युरोपिय देशांच्या राजदूतांसाठी सीमाभागाचा विशेष दौरा आयोजित केला होता. संयुक्त राष्ट्रसंघाचे शांतीसैनिक तैनात असलेल्या या लेबेनॉनच्या सीमेजवळील हिजबुल्लाहच्या वाढत्या हालचालींपासून इस्रायलला असलेला धोका अधोरेखित करण्यासाठी या दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम, ग्रीस, पोलंड आणि युरोपिय महासंघाचे राजदूत सहभागी झाले होते.

इस्रायलच्या सामरिक विभागाचे प्रमुख ब्रिगेडिअर जनरल ओरेन सेटर यांनी राजदूतांच्या पथकाची भेट घेतली. तसेच लेबेनीज जनता किंवा लष्कराविरोधात इस्रायलचे वैर नसल्याचेही सेटर यांनी स्पष्ट केले. लेबेनॉनचे सार्वभौमत्त्व व स्थैर्य सुरक्षित राखण्यासाठीच्या प्रयत्नांना इस्रायलचे पूर्ण समर्थन आहे. मात्र लेबेनीज जनतेच्या आडून इस्रायलवर हल्ल्याच्या तयारीत असलेल्या हिजबुल्लाहच्या विरोधात इस्रायल सज्ज असल्याची जाणीव ब्रिगेडिअर जनरल सेटर यांनी करून दिली.

यावेळी युरोपियन देशांच्या राजदूतांना गॅलिलीच्या सीमेजवळ हिजबुल्लाहने खणलेल्या व सध्या इस्रायली लष्कराच्या ताब्यात असलेल्या भुसूरुंगाचा मार्ग दाखविण्यात आला. त्याचबरोबर इस्रायलच्या सीमेजवळ हिजबुल्लाहने तयार केलेल्या भुयारांचीही माहिती इस्रायली लष्कराचे ब्रिगेडिअर जनरल श्‍लोमी बिंडर यांनी दिली.

‘हिजबुल्लाह आणि इराण यांच्यामध्ये घट्ट संबंध आहेत आणि यांच्यापासूनच या क्षेत्राला धोका आहे. हिजबुल्लाहपासून फक्त इस्रायलच नाही तर लेबेनॉनच्या सुरक्षेलाही तितकाच धोका आहे’, याची आठवण ब्रिगेडिअर जनरल बिंडर यांनी करुन दिली. इस्रायलमधील बेल्जियमचे राजदूत जीन-लूक बॉड्सन यांनी इस्रायली लष्कराने दाखविलेल्या पुराव्यांवर आश्‍चर्य व्यक्त केले. तसेच हिजबुल्लाहपासून फार मोठा धोका असल्याचे बॉड्सन यांनी मान्य केले.

इस्रायल, अमेरिका आणि ब्रिटनने इराणशी संलग्न असलेल्या हिजबुल्लाहला दहशतवादी संघटना जाहीर केले आहे. पण इस्रायल व अमेरिकेचा मित्रदेश असलेल्या फ्रान्सने हिजबुल्लाहच्या लष्करी संघटनेलाच दहशतवादी गटात टाकले आहे. मात्र युरोपिय महासंघाने देखील गेल्या काही वर्षांपासून हिजबुल्लाहबाबत मवाळ भूमिका स्वीकारली आहे. या पार्श्‍वभूमीवर, इस्रायलने युरोपिय देशांच्या राजदूतांसाठी लेबेनॉनजवळील सीमेचा दौरा आयोजित केल्याचे दिसत आहे.

leave a reply