येत्या दशकभरात नव्या साथीचा फटका बसण्याची शक्यता

- ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा इशारा

लंडन – येत्या दशकभरात जगाला नव्या रोगाच्या साथीचा फटका बसू शकतो, असा इशारा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिला. मंगळवारी ब्रिटनने आपल्या परराष्ट्र व संरक्षण धोरणाचा आढावा घेणारा ‘इंटिग्रेटेड रिव्ह्यू’ अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात पंतप्रधान जॉन्सन यांनी, 2030 सालापर्यंत एकापाठोपाठ संसर्गजन्य रोगांच्या साथींना तोंड द्यावे लागेल, असे बजावले आहे. याच अहवालात जॉन्सन यांच्या सरकारने दहशतवादी गटांकडून जैविक, रासायनिक व आण्विक हल्ल्याची शक्यता असल्याचाही दावा केला.

चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाव्हायरसच्या साथीने आतापर्यंत 26 लाखांहून अधिक बळी घेतले असून, साथीची तीव्रता पुन्हा एकदा वाढत असल्याचे इशारे देण्यात येत आहेत. ब्रिटनमध्ये 42 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून 1 लाख, 25 हजार जणांचा बळी गेला आहे. कोरोनाचा विषाणू सातत्याने बदलत असल्याचे समोर येत आहे. अमेरिका, ब्रिटन, ब्राझिल, दक्षिण आफ्रिकेसह आशियाई देशांमध्येही विषाणूचे नवे प्रकार आढळून आले आहेत. या नव्या प्रकारांमुळे साथीची तीव्रता वाढत असल्याचे सांगण्यात येते. या पार्श्‍वभूमीवर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी सादर केलेल्या अहवालातील नवा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो. पंतप्रधान जॉन्सन यांनी आपल्या इशार्‍यात ‘झोनोटिक डिसिजेस’चा उल्लेख केला आहे. प्राण्यांमध्ये असलेल्या विषाणू, जीवाणू अथवा परजीवींपासून मानवाला संसर्ग होणार्‍या आजारांना ‘झोनोटिक डिसिजेस’ असे म्हटले जाते. लोकसंख्येची वाढ व शेतीसाठी लागणारी वाढती जमीन यामुळे मानव आणि प्राणी यांच्यात परस्पर संपर्कात येण्याचे प्रमाण वाढेल. यातूनच ‘झोनोटिक डिसिजेस’च्या साथी येतील, असे पंतप्रधान जॉन्सन यांनी बजावले.

‘नव्या आजाराची साथ ही प्रत्यक्षात उतरू शकणारी बाब आहे. सध्याचा कल पाहता उपचार व औषधांना दाद न देणार्‍या आजारांमुळे बळी पडणार्‍यांची संख्या 2050 सालापर्यंत प्रतिवर्षी दोन कोटींपर्यंत गेलेली असू शकते’, असा इशाराही ब्रिटनच्या पंतप्रधानांनी दिला. यावेळी त्यांनी 2030 सालापर्यंत दहशतवादी गट आण्विक, रासायनिक व जैविक हल्ला चढविण्याची शक्यता आहे, असाही दावा केला आहे.

कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर, चीनमधील संशोधिका ‘शी झेंग्ली’ यांनी कोरोनाहून अधिक भयावह विषाणू अस्तित्त्वात असल्याचा दावा करून खळबळ उडवली होती. त्यानंतर आफ्रिकेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ ‘जीन-जॅक मुयेंबे तम्फुम’ यांनी, कोरोनाहून अधिक घातक विषाणू पुढील काळात जगात हाहाकार माजवू शकतात व त्याने संपूर्ण मानवतेला धोका आहे, असा गंभीर इशारा दिला होता. तर तीन वर्षांपूर्वी ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ), अज्ञात असलेल्या एखाद्या विषाणूमुळे जगभरात हाहाकार उडविणारी भीषण साथ येऊ शकते आणि या साथीमुळे कोट्यवधी नागरिकांचा बळी जाऊ शकतो, असे बजावले होते.

leave a reply